Atal Bihari Vajpayee : निधनाच्या आधीच त्रिपुराच्या राज्यपालांनी वाहिली श्रद्धांजली

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

''भारताचे माजी पंतप्रधान सहा दशकांपासून राजकीय क्षितिजावर चमकणारे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरवात केली. अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. ओम शांती''.

- तथागत रॉय, राज्यपाल, त्रिपुरा

अगरताळा : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी देशभरात प्रार्थना सुरू आहेत. असे असताना त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांना ट्विट करत चक्क त्यांना श्रद्धांजलीच वाहिली. 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल तथागत रॉय यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले होते, की ''भारताचे माजी पंतप्रधान सहा दशकांपासून राजकीय क्षितिजावर चमकणारे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे खासगी सचिव म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरवात केली. अतिशय बुद्धिमान आणि विनम्र असणारे अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. ओम शांती'', असे ट्विट रॉय यांनी केले होते. मात्र, त्यांनी वाजपेयींच्या निधनापूर्वीच याबाबतचे ट्विट केल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर मात्र त्यांनी याप्रकाराबाबत माफी मागितली.  

दरम्यान, रॉय यांनी वाजपेयींच्या निधनाबाबत ट्विट केल्यानंतर नेटिझन्सकडून त्यांना ट्रोल केले जाऊ लागल्यानंतर त्यांना चुकीची जाणीव झाली. त्यानंतर रॉय यांनी पुन्हा ट्विट केले आणि माफी मागितली. 'मला माफ करा. टीव्हीवरील वृत्त पाहून मी ट्विट केले होते. अद्याप याबद्दलची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मी माझे आधीचे ट्विट डिलिट केले आहे. मला पुन्हा एकदा माफ करा,' असे रॉय यांनी ट्विट करत माफी मागितली. 

Web Title: Atal Bihari Vajpayee Tribute from Governor of Tripura before the death