
जसं माझ्या नवऱ्याला मारलं, तशीच त्याचीही हत्या व्हावी; 48 तासांपूर्वी जया पालने केले होतं विधान
नवी दिल्ली - माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर संपूर्ण यूपीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. अतीकच्या हत्येबाबत सर्व प्रकारची विधाने समोर येत आहेत. आता उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनी अतीक अहमद याच्याबाबत ४८ तासांपूर्वी दिलेले वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फेब्रुवारी महिन्यात उमेश पाल यांची हत्या करण्यात आली होती. अतीक आणि त्याच्या साथीदारांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी असद यांच्या हत्येबाबत एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनी म्हटले होते की, ज्या पद्धतीने त्यांच्या पतीची हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने अतीकलाही मारण्यात यावे.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या बाईटमध्ये जया पाल म्हणाल्या होत्या की, "माननीय मुख्यमंत्र्यांकडून ज्या पद्धतीने कारवाई केली जात आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आरोपींची चौकशी त्यांनी करावी एवढीच माझी इच्छा आहे. तसेच ज्यांनी माझ्या नवऱ्याची आणि दोन गनरची ज्या प्रकारे हत्या केली, त्यांनाही अशाच पद्धतीने मारण्यात यावे, एवढीच माझी मागणी असल्याचं जया पाल म्हणाल्या होत्या.