देशात 40 टक्के एटीएमची फेररचना

पीटीआय
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

एटीएमची फेररचना केल्याने प्रत्येक एटीएममध्ये आता 50 ते 60 लाख रोकड बसत आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना एटीएममधून पैसे मिळू शकतील; तसेच एटीएमबाहेरील रांगाही कमी होतील.
- रितूराज सिन्हा, अध्यक्ष, कॅश लॉजिस्टिक्‍स असोसिएशन

पाचशे, दोन हजारच्या नव्या नोटा मिळण्यास सुरवात; महिनाअखेरपर्यंत प्रक्रिया संपणार
नवी दिल्ली - पाचशे व दोन हजारच्या नव्या नोटा एटीएममधून मिळण्यासाठी देशभरातील 82 हजार 500 एटीएमची फेरचना पूर्ण करण्यात आली आहे. देशात 2.2 लाख एटीएम असून, या महिनाअखेरपर्यंत एटीएम यंत्रणा पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

याविषयी माहिती देताना कॅश लॉजिस्टिक्‍स असोसिएशनचे अध्यक्ष रितूराज सिन्हा म्हणाले, ""सरकारने नियुक्त केलेल्या कृती समितीच्या निर्देशानुसार एटीएमची फेररचना करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात येत आहे. काल (सोमवार) सायंकाळपर्यंत देशभरातील 82 हजार 500 एटीएमची फेररचना पूर्ण झालेली आहे. देशभरात 2.2 लाख एटीएम असून, सध्या 40 टक्के एटीएमची फेररचना पूर्ण झालेली आहे. एटीएमची फेररचना करताना ग्रामीण भागांना प्राधान्य देण्यात येत असून, यात प्रादेशिक समतोल राहील, याकडेही लक्ष दिले जात आहे.'' सरकारने रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या कृती समितीचे सिन्हा हे सदस्य आहेत.

'एटीएमची फेररचना केल्याने प्रत्येक एटीएममध्ये आता 50 ते 60 लाख रुपयांची रोकड बसत आहे. फेररचना करण्याआधी एटीएममध्ये शंभर रुपयांच्या नोटा केवळ पाच लाख रुपयांपर्यंत बसत आणि त्या लवकर संपत. दररोज सुमारे 12 ते 14 हजार एटीएमची फेररचना केली जात आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत एटीएम यंत्रणा पूर्ववत सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे,'' असे सिन्हा यांनी सांगितले.

Web Title: atm system to be retained by month end