कुपवाड्यातील छावणीवर दहशतवादी हल्ला; 3 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

पहाटे चारच्या सुमारास दहशतवाद्यांनी कुपवाड्यातील पांझगाममधील लष्करी छावणीस लक्ष्य केले, हे ठिकाण राजधानीपासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे.

श्रीनगर - उत्तर काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यामध्ये तीन जवानांसह एक कॅप्टन हुतात्मा झाला असून, अन्य पाच जवान जखमी झाले आहेत.

या वेळी प्रत्युत्तरादाखल भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारामध्ये "जैशे महंमद' या संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले. तब्बल 35 मिनिटे ही चकमक सुरू होती. दरम्यान या चकमकीनंतर जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यास सुरवात केल्याने परिस्थिती आणखीनच चिघळली होती. यावेळी सुरक्षा दलांनाही आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार करावा लागला यामध्ये एका वृध्दाचा मृत्यू झाल्याचे समजते. 

पहाटे चारच्या सुमारास दहशतवाद्यांनी कुपवाड्यातील पांझगाममधील लष्करी छावणीस लक्ष्य केले, हे ठिकाण राजधानीपासून शंभर किलोमीटर अंतरावर आहे. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या कॅप्टनची ओळख पटली असून, त्यांचे नाव आयुष यादव असे आहे. अन्य मृतांमध्ये सुभेदार भूपसिंह गुज्जर आणि नायक बी. व्यंकट रामण्णा यांचा समावेश आहे. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या अन्य पाच जवानांना तातडीने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अंधाराचा फायदा घेत काही दहशतवादी लष्करी छावणीत घुसल्याचा संशय व्यक्त केला जात होता, त्यामुळे लष्कराची शोध मोहीम उशिरापर्यंत सुरूच होती. दरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या हल्ल्यानंतर शोक व्यक्त केला आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांबाबत सहानुभूती व्यक्त करताना त्यांनी जखमी जवानही तत्काळ बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांनी जवानांना लक्ष्य करण्यासाठी ग्रेनेडचा वापर केल्याचे लष्कराचे प्रवक्‍ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.

Web Title: attack on kupwara army camp, 2 terrorists killed