बिहारमध्ये निर्वस्त्र महिलेची धिंड, माथेफिरू जमावाचे कृत्य 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

पाटणा : येथे भोजपूर जिल्ह्यातील बिहिया या गावात एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गावर आढळून आल्यानंतर बेभान झालेल्या संतप्त जमावाने "रेड लाईट एरियाती'ल एका महिलेला पकडून तिची गावभर निर्वस्त्र धिंड काढल्याची धक्कादायक घटना आज घडली. या घटनेमुळे बिहारमधील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगल्या गेली आहेत. पोलिसांनी याप्रकरणी पंधरा जणांना अटक केली असून, तीनशे प्रत्यक्षदर्शींना साक्षीदार बनविण्यात आले आहे. 

सध्या देशभर विविध राज्यांत जमावाकडून होणारे हल्ले वाढले असताना बिहार राज्यदेखील त्याला अपवाद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आज बिहिया गावातील एक महिला जमावाच्या क्रौर्याचा बळी ठरली. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, ज्या तरुणाचा मृतदेह लोहमार्गावर आढळून आला तो आरा येथे कार्यालयीन कामकाजासाठी आला होता. या लोहमार्गाला लागूनच "रेडलाईट एरिया' असल्याने जमाव संतप्त झाला. या वेळी त्या जमावाने "रेडलाईट एरिया'तील असंख्य घरांची तोडफोड करत आगीही लावल्या; तसेच येथील एका महिलेला आरोपी ठरवित तिची निर्वस्त्र धिंड काढली. या वेळी काहींनी तिला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाणदेखील केली. 

तरुण दामोदरपूरचा 
दामोदरपूर गावचा रहिवासी असणारा विमलेश शहा हा तरुण रविवारपासून बेपत्ता होता, सोमवारी त्याचा मृतदेह लोहमार्गावर आढळून आला. "रेडलाईट एरिया'मध्ये वास्तव्य करणाऱ्यांनीच हे कृत्य केल्याचा आरोप करत जमावाने हल्ला चढविला. या वेळी काहीजणांनी रेल्वेवर दगडफेकदेखील केली. या दगडफेकीत सिकंदराबाद-पाटणा एक्‍स्प्रेसमधील अनेक प्रवासी जखमी झाल्याचे समजते. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. 

माहथिन माईचा वारसा 
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचाही समावेश असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या आठ पोलिसांनाही निलंबित करण्यात आले आहे. जमावाने या वेळी दुकानांना आगी लावत पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली. काही हल्लेखोरांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्याचेही समजते. बिहियातील माहथिन माई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे, कधीकाळी महिलांच्या आत्मसन्मानासाठी या स्त्रीने व्यवस्थेविरोधात बंड पुकारले होते. त्याच गावामध्ये जमावाकडून ही घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

Web Title: attacked on Woman in bihar