गुजरातमध्ये परप्रांतीयांवर हल्ले; बालिकेवरील बलात्कारानंतर उद्रेक 

गुजरातमध्ये परप्रांतीयांवर हल्ले; बालिकेवरील बलात्कारानंतर उद्रेक 

अहमदाबाद : साबरकांठा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 14 महिन्यांच्या बालिकेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी मूळ बिहारचा रहिवासी असलेल्या आरोपीला अटक केल्यानंतर गुजरातमध्ये परप्रांतीयांविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. राज्याच्या विविध भागांत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना लक्ष्य केले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोशल मीडियात परप्रांतीयांविरोधातील मेसेज व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर हल्ले सुरू झाले आहेत. 

आठवडाभरात गांधीनगर, मेहसाणा, साबरकांठा, पाटणा आणि अहमदाबाद जिल्ह्यात परप्रांतीयांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 150 जणांना अटक करण्यात आली, असे पोलिस महासंचालक शिवानंद झा यांनी शनिवारी सांगितले. 28 सप्टेंबरला साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगरजवळील गावात अवघ्या 14 महिन्यांच्या बालिकेवर बलात्काराची घटना घडली. पीडित बालिका ही ठाकोर समाजातील आहे. बलात्काराची घटना घडली, त्याच दिवशी रवींद्र साहू (रा. बिहार) याला अटक करण्यात आली.

या घटनेनंतर परप्रांतीयांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्‍वभूमीवर क्षत्रिय ठाकोर सेनेचे प्रमुख, कॉंग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर यांनी शुक्रवारी आपल्या समाजाला, तसेच संघटनेच्या सभासदांना शांतता राखण्याचे आवाहन केले. परप्रांतीय हेदेखील आपले बांधवच असल्याचे त्यांनी नमूद केले. 

दरम्यान, हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक पोलिसांना कारखाने, तसेच परप्रांतीयांची अधिक संख्या असलेल्या हौसिंग सोसायट्यांच्या आवारात गस्त वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आम्ही सोशल मीडियातील मेसेजवर बारीक लक्ष ठेवून आहोत, असे झा यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com