अविनाश पांडे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

गुजरात व राजस्थान या दोन राज्यांसाठी नवीन सरचिटणीस नेमल्यानंतर याआधी ही राज्ये सांभाळणाऱ्या गुरुदास कामत यांच्यासंबंधी विचारणा केली असता सुरजेवाला यांनी ते अद्याप सरचिटणीस असल्याचे सांगितले. 

नवी दिल्ली - कॉंग्रेस संघटनेच्या पातळीवर आज आणखी काही फेरबदल करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्राच्या अविनाश पांडे यांना सरचिटणीसपद देण्यात आले असून त्यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे बदल सुरू झाले असून, राहुल गांधी यांची "टीम' हळूहळू संघटनेवर आपली पकड जमवू लागल्याचे चित्र दिसत आहे. 

अविनाश पांडे हे राज्यसभेत सदस्य होते. तसेच अनेक वर्षे त्यांनी कॉंग्रेस महासमितीमध्ये सचिव म्हणून आणि अन्य संघटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. महासमितीत काम करण्याचा दीर्घकाळ अनुभव असलेले पदाधिकारी म्हणून ते ओळखले जातात. 

सर्वसाधारणपणे संघटनात्मक बदलाच्या घोषणांचे पत्रक सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांच्या सहीने जारी केले जाते. परंतु आज त्याला फाटा देऊन पक्षाच्या मीडिया विभागाचे प्रमुख व मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बरोबर आणलेल्या हस्तलिखित कागदाच्या आधारे या घोषणा केल्या. आजच्या फेरबदलांमध्ये पंजाब प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सुनील जाखड यांची तर उत्तराखंड प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी प्रीतमसिंग यांची नेमणूक करण्यात आली. पक्षाच्या कायदा व मानवाधिकार विभागाचे प्रमुख म्हणून राज्यसभा खासदार विवेक तन्खा यांची नेमणूक झाली आहे. चार सचिवांचीही नेमणूक जाहीर करण्यात आली आहे. 

गुजरात व राजस्थान या दोन राज्यांसाठी नवीन सरचिटणीस नेमल्यानंतर याआधी ही राज्ये सांभाळणाऱ्या गुरुदास कामत यांच्यासंबंधी विचारणा केली असता सुरजेवाला यांनी ते अद्याप सरचिटणीस असल्याचे सांगितले. 

Web Title: Avinash Pande appointed General Secretary incharge of Raj Cong