कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत महाराष्ट्राचा झेंडा!

महाराष्ट्रातील सर्वाधिक पाच जिल्ह्यांनी बाजी मारली. सातारा, सिंधुदुर्ग,ठाणे,वाशिम आणि सोलापूर या विजयी जिल्ह्यांना आज गौरविण्यात आले.
awards to 5 districts in maharashtra central governments skill development plan competition minister Rajesh Agarwal
awards to 5 districts in maharashtra central governments skill development plan competition minister Rajesh Agarwalsakal

नवी दिल्ली : केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्या ‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत(२०२०-२१)’ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाच जिल्ह्यांनी बाजी मारली. सातारा, सिंधुदुर्ग,ठाणे,वाशिम आणि सोलापूर या विजयी जिल्ह्यांना आज गौरविण्यात आले. ठाणे जिल्हा प्रशासन आगामी काळात जिल्हयातील तृतीयपंथींयासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविणार असल्याचे सांगण्यात आले.

जनपथावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर केंंद्रात झालेल्या कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते‘ जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेचे’(२०२०-२१) पुरस्कार वितरित करण्यात आलेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ४६७ जिल्हयांतून विजयी ठरलेल्या ३० जिह्यांना तीन श्रेणींमध्ये या यावेळी गौरविण्यात आले. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाने पुरस्कार निवडीसाठी दिल्ली आणि खरगपूर आयआयटीच्या तज्ज्ञांची नेमणूक केली होती.

सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ‘उत्कृष्ट पुरस्कार’

‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत’ देशभरातील ८ जिल्ह्यांना ‘उत्कृष्ट पुरस्कार’ श्रेणीत गौरविण्यात आले. राज्यातील सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा यात समावेश आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पुरस्कार स्वीकारले.

शेखर सिंह म्हणाले की देशातल्या ८ जिल्हयांमध्ये सातारा पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आहे याचा आनंद वाटतो. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात मोलाचा वाटा आहे. कोविड महामारीच्या काळात केंद्र आणि राज्यशासनाच्या कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जवळपास १ हजार कोविड फ्रंटलाईन कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. साहसी खेळ, ग्रामीण व कृषी पर्यटनासाठी ग्रामीण भागात प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली. कोविडमुळे विधवा झालेल्या स्त्रिया आणि कातकरी समाजातील लोकांना येत्या काळात कौशल्य प्रशिक्षण देण्याची त्याचप्रमाणे ग्रामीण व कृषी पर्यटन प्रशिक्षण केंद्रांचा विस्तार करण्याचीही योजना विचारधीन आहे.

मंजूलक्ष्मी म्हणाल्या की पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांना आदरातिथ्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.मालवण आणि वेंगुर्ला भागातील न्याहरी निवासांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. मत्स्यव्यवसाय,आंबा, काजू आणि बांबुवरील प्रक्रिया उद्योगाबाबत विविध कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमही जिल्हा प्रशासनाने राबविले आहेत.

ठाणे आणि वाशिम जिल्हयांना उत्कृष्ट प्रमाणपत्र

या गटात देशभरातून १३ जिल्ह्यांना ‘उत्कृष्ट प्रमाणपत्र पुरस्कार’ श्रेणीत गौरविण्यात आले. ठाणे आणि वाशिम जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाणे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता जावळे आणि वाशिम जिल्ह्याच्या त्यांच्या समकक्ष सुनंदा बजाज यांनी पुरस्कार स्वीकारला.

जावळे म्हणाल्या की ठाणे जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के लोकसंख्या १५ ते ३० वयोगटाची आहे. त्यामुळे तरुणांना केंद्रस्थानी ठेवून विविध कौशल्य कार्यक्रमांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. ठाणे जिल्हयात शहरी, ग्रामीण आणि आदिवासी महिलांचे स्थलांतर थांबविण्यासाठी त्यांना कौशल्य प्रशिक्षण देवून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.

बजाज यांनी सांगितले की वाशिम जिल्ह्यातूनच प्रस्तावित ‘बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग’ जात असल्याने बांधकाम क्षेत्रात तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. केंद्र शासनाच्या ‘संकल्प’ कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील महिलांसाठी बेकरी, पाककला आणि शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम राबविले.

सोलापूर जिल्हयाला प्रशस्तीपत्र

‘प्रशस्तीपत्र पुरस्कार’ या गटात देशभरातून ९ जिल्ह्यांना गौरविण्यात आले. यात सोलापूर जिल्ह्यालाही सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

शंभरकर यांनी सांगितले की मेडीकल हब म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख असून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून जिल्हयात अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. हे लक्षात घेवून रुग्णांना गुणवत्तापूर्ण औषधोपचार देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. केळी, द्राक्ष प्रक्रियाविषयक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. ऑनलाईन सॉफ्टस्कील प्रोगाम यशस्वीपणे राबविण्यात आल्याचेही शंभरकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com