Ayodhya Hearing : सर्वोच्च न्यायालयाकडून मध्यस्थांना 15 ऑगस्टपर्यंतची वेळ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मे 2019

अयोध्या वादावर सर्वसंमतीने तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थांच्या मागणीप्रमाणे 15 ऑगस्टपर्यंतचा वेळ वाढवून दिला आहे.

नवी दिल्ली : अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या. एफ. एम. आय. खलीफुल्ला यांनी आज (ता.10) समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. यावेळी अयोध्या वादावर सर्वसंमतीने तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांनी सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागितला होता. यावर सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थांना 15 ऑगस्टपर्यंतचा वेळ वाढवून दिला आहे.

या प्रकरणात सौहार्दपूर्ण समेट होण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी मध्यस्थांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने 6 मे रोजी आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सुपुर्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 8 मार्चला हे प्रकरण मध्यस्थीसाठी समितीकडे सोपवण्याचा आदेश दिला होता.

दरम्यान, निवृत्त न्यायाधीश एफ. एम. कलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर, तसेच ज्येष्ठ वकील श्रीराम पांचू हे दोन सदस्य आहेत. याप्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ सुनावणी होत आहे. तसेच, सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस.ए. बोबडे, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर या पाच न्यायाधीशांच्या उपस्थित सुनावणी घेण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayodhya hearing SC grants time to mediators till August 15