अयोध्येतील निमंत्रितांना देण्यात येणार खास चांदीचा शिक्का; पाहा फोटो

वृत्तसंस्था
Tuesday, 4 August 2020

अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन आणि शिलान्यास होणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाय हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पूर्ण तयारी केली आहे

नवी दिल्ली- अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन आणि शिलान्यास होणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाय हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पूर्ण तयारी केली आहे. निमंत्रितांसाठी सोहळा आठवणीचा करण्यासाठी ट्रस्टने कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना एक चांदीचा शिक्का भेट देण्याचं ठरवलं आहे. शिक्क्यावर प्रभू राम यांची मुद्रा असणार आहे. 

अबब ! राम मंदिरासाठी त्यांनी तब्बल २३ वर्षे  घातली नाही पायात चप्पल

ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी या सोहळ्याबद्दल माहिती दिली आहे. भारतातील प्रमुख 35 परंपरांच्या 135 संत-महात्म्यांसह जवळजवळ पावणे दोनशे लोक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजनासाठी 1500 पेक्षा अधिक पवित्र स्थळावरुन माती आणण्यात आली आहे. तसेच 100 पेक्षा अधिक पवित्र नद्यांचे पाणी आणण्यात आलं आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे पहिले निमंत्रण विघ्नहर्ता भगवान गणेशला देण्यात आलं आहे. दुसरे निमंत्रण बाबरी मशिदचे पक्षकार इकबाल अंसारी यांना देण्यात आलं आहे. शिवाय बेवारस मृतदेहांचा अंतिम संस्कार करणारे समाजसेवक पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही निमंत्रण पाठवण्यात आलं असल्याची माहिती चंपत राय यांनी दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह निमंत्रण पत्रिकेवर  तिघांची नावे आहेत. यावेळी व्यासपीठावर केवळ पाच व्यक्ती असणार आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नित्या गोपालदास यांचा समावेश आहे. निमंत्रण पत्रिकेवर राम लल्लाचा फोटो आहे. 

जगाची लोकसंख्या घटणार; कधी ते पहा पहा ग्राफिक्सच्या माध्यमातून

राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजनासाठी येणार असल्याने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोरोना महामारी थैमान घालत असताना हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यादृष्टीनेही अयोध्येत खबरदारी घेण्यात आली आहे. अयोध्येत बाहेरील लोकांना येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शिवाय या सोहळ्यासाठी काही विशिष्ठ व्यक्तींनाचा निमंत्रण देण्यात आले आहे. काही राजकीय नेते, धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayodhya special guest will given silver coin