अयोध्या दहशतवादी हल्ल्यातील चौघांना जन्मठेप, एकाची मुक्तता

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जून 2019

अयोध्येतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आज प्रयागराज येथील विशेष न्यायालयात पाच दहशतवाद्यांविरोधात शिक्षेची सुनावणी झाली. या प्रकरणात एकूण 63 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या.

अयोध्या: अयोध्या येथे 2005 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने आज (मंगळवार) चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर एकाची निर्दोष मुक्तता केली. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या चौघांना प्रत्येकी ४० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

अयोध्येतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आज प्रयागराज येथील विशेष न्यायालयात पाच दहशतवाद्यांविरोधात शिक्षेची सुनावणी झाली. या प्रकरणात एकूण 63 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. यामध्ये 14 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दहशतवादी हल्ल्यातील अरशद याला त्याचवेळी ठार करण्यात आले होते.

राम जन्मभूमी येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा सुनावली जावी अशी मागणी करण्यात येत होती. 5 जुलै 2005 रोजी सकाळी 9.15 च्या सुमारास दहशतवाद्यांनी रामजन्मभूमी परिसरात बॉम्बस्फोट घडवला होता. जवळपास अडीच तास चाललेल्या चकमकीत पोलिसांनी 5 दहशतवाद्यांना ठार केले होते. या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना सुरक्षा यंत्रणांनी जम्मू-काश्मीर येथून अटक केली होती. या प्रकरणी इरफान, मोहम्मद शकील, मोहम्मद नसीम, मोहम्मद अजीज आणि फारूक हे पाचजण तुरुंगात होते. मोहम्मद अजीजची मुक्तता करण्यात आली आहे. तर इतर चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  

गेल्या 14 वर्षांपासून या प्रकराची सुनावणी सुरु होती. एका मोठ्या सुनावणीनंतर न्यायाधीशांनी निर्णय घेण्यासाठी 18 जून ही तारीख दिली होती. 14 वर्षांच्या कालावधीत 63 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. या हल्ल्यातले दहशतवादी राम भक्त बनून अयोध्येत घुसल्यानंतर या भागाची रेकी केली होती. त्यानंतर टाटा सुमो गाडीने प्रवासही केला. हल्ला करण्याआधी दहशतवाद्यांनी राम मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. त्यानंतर गाडीमध्ये बसून रामजन्मभूमी परिसरात आले तिथले सुरक्षेचे कडे मोडून ग्रेनेड हल्ला केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayodhya terror attack case Life imprisonment for four accused