Ayodhya Verdict : न्यायालयाच्या निर्णयावर सुन्नी वक्फ बोर्ड असमाधानी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सुन्नी वक्फ बोर्डाने केलेले दावे फेटाळून लावले आहेत. त्यामुळं वक्फ बोर्डाच्या वकिलांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. या संदर्भात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वकील झाफरयाब गिलानी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला. त्यात वादग्रस्त 2.77 एकर जागा रामलल्ला पक्षकारांना देण्यात आली तर, सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच 5 एकर जागा देण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आले आहेत. देशभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. पण, सुन्नी वक्फ बोर्डाने मात्र, नाराजी व्यक्त केली आहे. जर, आमच्या कमिटीने मान्यता दिली तर, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार आम्ही फेरविचार याचिका दाखल करू, असे वकील झाफरयाब गिलानी यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी देशभरात शांततेचे आवाहन केले आहे. 

तसेच, न्यायालयाचा पूर्ण निकाल ऐकून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, असे वक्फ बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सुन्नी वक्फ बोर्डाने केलेले दावे फेटाळून लावले आहेत. त्यामुळं वक्फ बोर्डाच्या वकिलांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. या संदर्भात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वकील झाफरयाब गिलानी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. न्यायालयाच्या निर्णयाबाबत असमाधानी असलो तरी, आम्ही त्या निर्णयाचा आदर करतो, असे गिलानी यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. 

गिलानी म्हणाले, 'आमचा दावा जमिनीसाठी नव्हता. मशिदीच्या जागेसाठी होता. मशिदीच्या जागेची काही किंमत होत नाही. नमाज होत असताना ती जागा दुसऱ्या समाजाला देणे हा आमच्यासाठी न्याय नाही. तेथे नमाज पठण होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याचवेळी तेथे पूजा होत नसल्याचे कोर्टाने मान्य केले नाही. कोर्टाचा संपूर्ण निकाल वाचूनच पुढचा निर्णय घेऊ.' वकिलांशी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ, असेही गिलानी यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ayodhya verdict sunni waqf board is unsatisfied on supreme court judgement