चिक्कोडी जिल्हा करा, अन्यथा महाराष्ट्रात पाठवा - संगाप्पगोळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

चिक्कोडी - विकासाच्या दृष्टीने सीमावर्ती भागातील जनता त्रस्त असून, त्यांच्या विकासासाठी तरी चिक्कोडी जिल्ह्याची घोषणा करा, अन्यथा आम्हाला महाराष्ट्रात सामील होण्यास मुक्त करा, अशी मागणी चिक्कोडी जिल्हा मागणी समितीचे नेते बी. आर. संगाप्पगोळ यांनी केली.

सरकारी विश्रामधामावर आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. श्री. संगाप्पगोळ म्हणाले, की चिक्कोडीला बेळगावप्रमाणे महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्हे नजीकचेच आहेत. येथील राज्य शासन आमच्या विकासाकडे साफ दुर्लक्ष करीत असल्यास आपण येथे राहण्यात काय अर्थ आहे? राज्यातील कोणत्याही नेत्यांच्या दबावाला बळी न पडता मुख्यमंत्र्यांनी तातडीने चिक्कोडी जिल्ह्याची घोषणा करावी. चिक्कोडी जिल्ह्याची निर्मिती राजकीय पुढाऱ्यांना नकोशी असून, या भागातील जनतेच्या विकासासाठी त्याची गरज आहे. 

जिल्हानिर्मितीच्या बाबतीत राज्य शासनाकडून आजवर सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्याबाबत जागृती करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अथणी, कागवाड व रायबाग विधानसभा मतदारसंघात समितीतर्फे जनजागृतीचे कार्य करण्यात येत आहे. पुढील काळात या भागातील जनतेच्या हितासाठी एक तर चिक्कोडी जिल्ह्याची निर्मिती करा, अन्यथा आपल्याला महाराष्ट्रात सामील होण्यास मुक्त करा, असा ठराव ग्रामपंचायतीतून करण्यात येणार आहे. या वेळी एस. वाय. हंजी, आप्पासाहेब चौगुले, तुकाराम कोळी, प्रकाश मगदूम उपस्थित होते.

Web Title: B R Sangappgol comment