आमदार लक्ष्मी हेब्बाळकर इतके दिवस गप्प का?

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर इतके दिवस गप्प का?

बंगळूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा व बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. ‘तुम्हाला ३० कोटींचे आमिष व मंत्रिपदाची ऑफर कोणी दिली?’ असा प्रश्न करून त्या व्यक्तीचे नाव जाहीर करण्याचे आव्हान दोघांनीही दिले. ‘हे खरे असेल तर आजवर तुमचे तोंड का बंद होते?’ असा प्रश्नही त्यांनी केला.

शिमोगा येथे पत्रकारांशी बोलताना येडियुराप्पा म्हणाले, ‘आमदार हेब्बाळकर यांना पैशाचे आमिष व मंत्रिपदाची ऑफर देणाऱ्या व्यक्तीचे नाव त्यांनी जाहीर करावे, म्हणजे जनतेला खरे काय ते कळेल. युती सरकारमधील आमदार संघटित राहिले तर आम्ही सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही.

आपापसातील मतभेदातून युती सरकार कोसळले तर पुढे पाहता येईल. पुराव्याविना केलेल्या आरोपामुळे खेद वाटतो. स्वत: मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी गुलबर्गा जिल्ह्यातील आमच्या पक्षाच्या आमदारांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती. आम्ही सध्या विरोधी पक्षात आहोत, आमचे काम आम्ही करीत आहोत.’ 

संजय पाटलांची टीका
माजी आमदार संजय पाटील यांनीही लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वक्तव्याला जोरदार आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, ‘हेब्बाळकर यांना ३० कोटी देण्याएवढी वाईट स्थिती भाजपची झालेली नाही. ३० कोटी व मंत्रिपदाची ऑफर दिली होती, तर इतके दिवस त्या गप्प का होत्या? त्यांनी आमिष दाखविणाऱ्या व्यक्तीचे नाव तत्काळ जाहीर करावे. मागील निवडणुकीत त्यांना विजयी करण्यासाठी रमेश जारकीहोळी यांनी प्रयत्न केले. आता त्यांना विसरून त्यांच्यावरच त्या टीका करीत आहेत. विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला पराभूत करण्यासाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पैसे वाटले होते.’

निवडणुकीत संजय पाटील यांना मतदारांनी जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देण्याइतपत ते मोठे नाहीत. योग्य वेळ आली, की मी केलेल्या वक्‍तव्याचा खुलासा करणार असून पुरावेही देईन.
- लक्ष्मी हेब्बाळकर,
आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com