'बाबरी' केंद्राच्या नियंत्रणाखाली न आणणे मोठी चूक'

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

रोज पुरावे जमा होत होते. कोणतीही जाणकार व्यक्ती सांगू शकत होती की, बाबरी धोक्‍यात आहे. कारसेवकांना निरोप देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात हातोडे, कुऱ्हाडी कशा आल्या. 
पी. चिदंबरम, माजी वित्तमंत्री 

मुंबई : तत्कालीन पी. व्ही. नरसिंह राव सरकारने बाबरी मशीद प्रकरण केंद्राच्या नियंत्रणाखाली न आणून एक मोठी राजकीय चूक केली असल्याचे वक्तव्य कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केले. याबाबतची चाहूल खूप आधी लागली होती, असा गौप्यस्फोटही चिदंबरम यांनी केला आहे. 

टाटा लिटरेचर फेस्टिव्हलअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त चर्चेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, "या घटनेला निर्णय क्षमतेतील त्रुटी म्हणून आपण दुर्लक्ष करू शकत नाही. याचे परिणाम राव यांना त्या वेळी भोगावे लागले. त्यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास व आपले पद दोन्हीही गमावले.'' 

बाबरी मशीद धोक्‍यात असल्याची माहिती अनेकांनी नरसिंह राव यांना दिली होती. कोणत्याही परिस्थितीत बाबरी मशीद जमीनदोस्त होऊ नये, अशी भूमिका आमच्या सरकारने घेत एक पत्रकही जारी केले होते. गरज पडल्यास लष्कर तैनात करण्याची तयारीही दर्शवली होती. मशिदीला थेट धोका नव्हता ना, ती कारसेवकांची उत्स्फूर्त कारवाई होती, असे चिदंबरम म्हणाले. 

रामेश्वरम येथून दगड आणले जात होते. त्यासाठी पूर्ण रेल्वे आरक्षित करण्यात आली होती. सर्वांना माहिती होते की लाखोंच्या संख्येने लोक जमणार आहेत. 

1987-88 पासूनच बाबरी मशिदीला धोका होता. राव यांनी तेथे अर्धसैनिक दलांना धाडून ही मशीद केंद्राच्या नियंत्रणाखाली असल्याचे स्पष्ट करणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. ही एक गंभीर चूक ठरली व त्याचे परिणाम देशाला आजही भोगावे लागत असल्याचे चिदंबरम यांनी स्पष्ट केले. 

रोज पुरावे जमा होत होते. कोणतीही जाणकार व्यक्ती सांगू शकत होती की, बाबरी धोक्‍यात आहे. कारसेवकांना निरोप देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात हातोडे, कुऱ्हाडी कशा आल्या. 
पी. चिदंबरम, माजी वित्तमंत्री 

Web Title: babri case was a mistake - chidambaram