बाळ रडल्याने विमानातून उतरविले 

पीटीआय
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली (पीटीआय) : तीन वर्षांचे बाळ रडले म्हणून युरोपमधील प्रतिष्ठित एअरलाइन्स कंपनीने एका भारतीय कुटुंबाला विमानातून उतरविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारत सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ब्रिटिश एअरवेजविरुद्ध वंशद्वेषी भेदभाव आणि उद्धट वागणुकीचा आरोप केला आहे. 

नवी दिल्ली (पीटीआय) : तीन वर्षांचे बाळ रडले म्हणून युरोपमधील प्रतिष्ठित एअरलाइन्स कंपनीने एका भारतीय कुटुंबाला विमानातून उतरविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारत सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ब्रिटिश एअरवेजविरुद्ध वंशद्वेषी भेदभाव आणि उद्धट वागणुकीचा आरोप केला आहे. 

ही घटना गेल्या महिन्यात लंडनहून बर्लिनला जाणाऱ्या विमान प्रवासादरम्यान घडली. विमान उड्डाण करण्यापूर्वी काही मिनिटे आधी बाळ रडू लागल्याने या कुटुंबाला विमानातून उतरविण्यात आले. रडणाऱ्या बाळाला शांत करण्याच्या प्रयत्नात त्याला बिस्किट देऊ इच्छिणाऱ्या कुटुंबालाही विमानातून उतरविल्याचा आरोप या अधिकाऱ्याने नागरी हवाईमंत्री सुरेश प्रभू यांना 3 ऑगस्ट रोजी पाठविलेल्या पत्रात केला आहे. 23 जुलै रोजी हा प्रकार घडला. 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात सहसचिवपदावर कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्याने पत्रात म्हटले आहे, की ब्रिटिश एअरवेजच्या लंडन-बर्लिन (बीए 8495) या विमानाच्या उड्डाणावेळी हा कथित प्रकार घडला. सुरक्षेसंबंधी उद्‌घोषणेनंतर आम्ही सीटबेल्ट बांधत होतो. माझ्या पत्नीने मुलाला सीट बेल्ट बांधला, त्या वेळी ते रडू लागले. माझी पत्नी त्याला शांत करत होती. त्या वेळी तेथे विमानातील कर्मचारी आले आणि पत्नी आणि मुलावर जोरजोरात ओरडू लागले, त्यामुळे मूल आणखी घाबरले. विमानाच्या उड्डाणावेळी मुलाला खिडकीतून बाहेर फेकून देण्याची धमकी कर्मचाऱ्यांनी दिली. तसेच, आमच्या वर्णावरून आक्षेपार्ह टिप्पणी केली. आमच्या आसनाच्या मागे बसलेल्या एका भारतीय कुटुंबानेही मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनाही विमानातून उतरवण्यात आले. 

कंपनीकडून घटनेची चौकशी सुरू 
अशा प्रकारचे आरोप गांभीर्याने घेतले जातात. अशी गैरवर्तणूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. प्रवाशांशी भेदभाव केलेले सहन केले जाणार नाही. आम्ही सातत्याने संबंधित प्रवाशांच्या संपर्कात असून, या घटनेची तातडीने चौकशी सुरू केली आहे, असे ब्रिटिश एअरवेजच्या प्रवक्‍त्याने सांगितले. 

Web Title: baby crying Dropped off family in plane