
Bageshwar Dham: 'मी कुणाच्या बापालाही घाबरत नाही, 'त्यांची' भीती वाटते' धीरेंद्र शास्त्रींचा खुलासा
नवी दिल्लीः चमत्काराचे दावे आणि मनातलं ओळखण्याच्या खुलाश्यांनी चर्चेत आलेले बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी आपण कुणाच्याही बापाला घाबरत नसल्याचं विधान केलं आहे.
नागपूरमध्ये दिव्य दरबाराचा कार्यक्रम घेतल्यानंतर बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री अचानक चर्चेमध्ये आले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धीरेंद्र शास्त्री यांना खुलं आव्हान देऊन चमत्कार आणि मनातलं ओळखण्याबद्दल जाब विचारला होता. त्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले.
हेही वाचाः झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच
महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या विधानाने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप झाले.
त्यानंतर मुंबईतल्या मीरा रोड भागात त्यांच्या दिव्य दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याही कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी देऊ नये, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. परंतु प्रशासनाने त्यांच्या कार्यक्रमात कुठलीही आडकाठी आणली नाही. बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमासाठी तुफान गर्दी जमली होती.
दरम्यान, बागेश्वर बाबांनी एका मुलाखतीमध्ये आपण कुणाच्याही बापाला घाबरत नसल्याचं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका पत्रकाराला मुलाखत देतांना बागेश्वर बाबा म्हणाले की, मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही.
त्यानंतर पत्रकाराने पुन्हा विचारलं की कधी भीती वाटत नाही? त्यावर ते म्हणाले की, कुणाच्या बापाला का भ्यावं. आम्ही ना कुणाच्या बापाचा बैल सोडला, ना कुणाच्या घरावर कब्जा केला, ना कुणाकडून दान स्वीकारलं..तर मग कुणाच्या बापाला भ्यायचं?
धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले की, मला फक्त हनुमानाची भीती वाटते, पाप करण्याची भीती वाटते. आमच्याकडून कधी असं कृत्य होऊ नये, ज्यामुळे धर्माला खाली बघायची वेळ येईल. या त्यांच्या उत्तरामुळे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.