प्रियांका गांधींच्या टीममध्ये मराठमोळा बाजीराव

वृत्तसंस्था
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशासाठी टीम जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या टीममधील तिघांना सचिवपद देण्यात आले आहे. या तिघांकडे सहप्रभारी म्हणून जबाबदारी असणार आहे. त्यात कोल्हापूरच्या बाजीराव खाडे यांचा समावेश आहे. प्रियांका यांच्या पहिल्या राजकीय जबाबदारीत मराठी माणसाची ही साथ मोलाची ठरणार आहे.

लखनौ : भाजपच्या पराभवासाठी मैदानात उतरलेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना आता एक मराठमोळा चेहरा कोल्हापुरचे बाजीराव खाडे मदत करणार आहेत. त्यांना आज (बुधवार) काँग्रेसचे सचिव म्हणून निवडण्यात आले आहे.
 
प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशासाठी टीम जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या टीममधील तिघांना सचिवपद देण्यात आले आहे. या तिघांकडे सहप्रभारी म्हणून जबाबदारी असणार आहे. त्यात कोल्हापूरच्या बाजीराव खाडे यांचा समावेश आहे. प्रियांका यांच्या पहिल्या राजकीय जबाबदारीत मराठी माणसाची ही साथ मोलाची ठरणार आहे.

करवीर तालुक्यातील सांगरूळ हे बाजीराव खाडे यांचे गाव आहे. 1996 पासून ते काँग्रेस पक्षाचे काम करत आहेत. ते राजीव गांधी पंचायत राजमध्ये गेल्या काही वर्षापासून सक्रिय आहेत. त्यांनी तेलंगणाचे प्रभारी म्हणूनही काम पाहिले आहे. गेल्या महिन्यातच त्यांची काँग्रेसच्या जाहीरनामा प्रदेश समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. यावरून असे दिसते की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्यात येत आहे. एमएससी अॅग्री, एमबीए शिक्षण घेतलेले खाडे यांना शासनाने कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने गौरवले आहे. यशवंत बँकेचे संचालक आणि कुंभी कासारी परिसरातील शेतकरी, दूध उत्पादक यांच्या न्यायासाठी लढणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

खाडे यांच्यासह प्रियांका गांधींच्या टीममध्ये जुबेर खान आणि कुमार आशिष यांचाही समावेश असणार आहे. याबरोबरच पश्चिम उत्तर प्रदेशसाठीही ज्योतिरादित्य सिंधिया यांची टीम जाहीर केली आहे. यात राणा गोस्वामी, धीरज गुर्जर आणि रोहित चौधरी यांचा समावेश आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bajirao Khade appointed as in charge in Priyanka Gandhi team of Uttar Pradesh