
Balasaheb Thorat Video : आमच्याकडेही तुमच्या नेत्यांचे फोटो अन् जोडे आहेत; थोरात आक्रमक, म्हणाले...
मुंबईः विधिमंडळाच्या आवारात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रतिमेला सत्ताधारी आमदारांकडून जोडे मारण्याचा प्रकार झाला. मात्र ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. अशा प्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीत विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांकडून घडता कामा नयेत, असं अजित पवार म्हणाले.
या घनटेचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र निषेध केला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं मानहानी प्रकरणात दोषी ठरवलं आहे, यामध्ये त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हा राहुल गांधी यांना मोठा झटका मानला जात आहे. मोदी या आडनावावरुन त्यांनी टिप्पणी केली होती, त्यामुळं त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणात राहुल गांधींना जामीनही मंजूर झाला आहे.
हेही वाचाः झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच
बाळासाहेब थोरात यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. ते म्हणाले की, आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत एवढं लक्षात ठेवा, आम्ही आजवर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पालन केले. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाभळी असतात हे सत्तापक्षाने लक्षात ठेवावे. स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या बाजूने लढणारे तुम्ही, आम्हाला काय शिकवणार? असा टोला थोरातांनी लगावला.
कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केलं. आपल्या ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणतात, "माझा धर्म हा सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य माझा देव आहे आणि अहिंसा त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे.' ही महात्मा गांधींची ओळ ट्वीट करत राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या शिक्षेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.