तमिळनाडूत उमटला स्वदेशीचा नारा; पेप्सी, कोकवर बहिष्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 1 मार्च 2017

चेन्नई - तमिळनाडूतील काही व्यापारी संघटनांनी स्वदेशीचा नारा पुकारत पेप्सी आणि कोका-कोला या शीतपेयांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. ही शीतपेये आरोग्यास धोकादायक असून त्यांच्या उत्पादन प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.

चेन्नई - तमिळनाडूतील काही व्यापारी संघटनांनी स्वदेशीचा नारा पुकारत पेप्सी आणि कोका-कोला या शीतपेयांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. ही शीतपेये आरोग्यास धोकादायक असून त्यांच्या उत्पादन प्रक्रियेदरम्यान पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.

तमिळनाडू ट्रेडर्स फेडरेशन (टीएनटीएफ) आणि कन्सोर्टियम ऑफ तमिळनाडू ट्रेडर्स असोसिएशन (सीटीएनटीए) या दोन संघटनांनी राज्यातील वीस लाख व्यापाऱ्यांना पेप्सी आणि कोका-कोला या आंतरराष्ट्रीय उत्पादनांऐवजी स्थानिक ब्रॅंड्‌च्या शीतपेयांची विक्री करण्याचे आवाहन केले आहे. या शीतपेयांना पर्याय म्हणून काली मार्क, बोवोंतो आणि टोरिनो यासारख्या स्थानिक शीतपेयांचा पुरवठा वाढविण्यात यावा असेही या संघटनांनी म्हटले आहे. या बहिष्कारामुळे दोन्ही कंपन्यांना सुमारे 1,400 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परंतु, सुपरमार्केटस आणि रेस्टॉरंटसने याविषयी कोणतीही भूमिका घेतली नसल्याने याठिकाणी ही शीतपेये उपलब्ध असतील.

"केवळ या कंपन्या आंतरराष्ट्रीय आहेत म्हणून आम्ही त्यांच्यावर बहिष्कार टाकलेला नाही. या शीतपेयांचा आरोग्याला धोका असल्याने आम्ही हे पाऊल उचलले आहे.", असे सीटीएनटीएचे अध्यक्ष ए एम विक्रमराजा म्हणाले. लवकरच केरळ आणि पॉंडिचेरीमध्येदेखील हे आंदोलन होण्याचे संकेत त्यांनी दिले.

पेप्सी आणि कोका कोला या कंपन्यांकडून स्थानिक विक्रेत्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. ही उत्पादने थंड ठेवण्यासाठी लागणाऱ्या वीजेचाही खर्च भागत नसल्याची तक्रार स्थानिक विक्रेते करतात. उत्पादन प्रक्रियेसाठी राज्यातील पाण्याचा बेसुमार वापर होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याचे या संघटनेच्या सदस्यांनी म्हटले आहे. परंतु ही उत्पादनांवरील बंदी नसून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन असल्याचेही संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Ban on Pepsi, Coca-Cola in Tamilnadu