साखर साठाबंदीला सहा महिने मुदतवाढ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - सणासुदीच्या काळात साखरेची साठेबाजी रोखण्याच्या दृष्टीने साखरेचा अतिरिक्त साठा करण्यावरील बंदी घालण्याचा आदेश केंद्र सरकारने आणखी सहा महिन्यांसाठी वाढविला आहे. त्यानुसार, साखरेचा साठा करण्यावर 29 ऑक्‍टोबर ते 28 एप्रिलपर्यंत ही बंदी लागू राहील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सार्वजनिक अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी याबाबत मांडलेला प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केला. या आधीच्या आदेशाची मुदत 28 ऑक्‍टोबरला संपत होती. साखरेचा काळाबाजार, नफेखोरी व साठेबाजीला लगाम घालणे, कमतरता भासेल तेव्हा केंद्राने सामान्यांसाठी रास्त दरात साखरेचा अतिरिक्त साठा बाजारात उपलब्ध करून देणे या उद्देशाने केंद्राने साखरेच्या साठेबाजीवरील बंदी लागू केली होती. आजच्या निर्णयानुसार साखरेचा पुरवठा, उत्पादन, वितरण, विक्री, साठा, खरेदी विक्री आदींचे नियंत्रण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना यापुढेही मिळत राहील. ग्राहक व्यवहार विभागाच्या विशिष्ट खाद्यपदार्थ दुरुस्ती आदेश 2016 लाही या निर्णयाद्वारे मुदतवाढ मिळाली आहे. यामुळे साखर कारखान्यांना आवश्‍यकतेनुसार सार्वजनिक वितरणासाठी साखर उपलब्ध करून द्यावी लागेल. बाजारपेठेत साखरेचा अतिरिक्त साठा करून सणासुदीच्या काळात त्याची भाववाढ करण्याच्या प्रकारांना यामुळे लगाम बसेल, अशी सरकारला आशा आहे.

Web Title: Ban on Sugar storage is extended