दूधसागरला गेल्यास कारागृहात पोचाल !

विनायक जाधव
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

बेळगाव - दूधसागरचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी जाताय? यापुढे सावधान राहा. अन्यथा तुम्ही कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो. दूधसागरवर पोलिसांनी पर्यटकांना बंदी घातल्यानंतरही पर्यटकांची दूधसागर पाहण्याची ओढ कमी झाली नसल्याने आता रेल्वे प्रशासनाने पर्यटकांवर आवर घालण्यासाठी रेल्वे कलम १४७ चे अस्त्र उगारले आहे.

बेळगाव - दूधसागरचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी जाताय? यापुढे सावधान राहा. अन्यथा तुम्ही कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो. दूधसागरवर पोलिसांनी पर्यटकांना बंदी घातल्यानंतरही पर्यटकांची दूधसागर पाहण्याची ओढ कमी झाली नसल्याने आता रेल्वे प्रशासनाने पर्यटकांवर आवर घालण्यासाठी रेल्वे कलम १४७ चे अस्त्र उगारले आहे.

दूधसागरला येणाऱ्या पर्यटकांना रेल्वे खात्याकडून रुळावरून चालणे, रूळ ओलांडणे कायद्याचे उल्लंघन ठरवीत लक्ष्य केले आहे. यामुळे यापुढे दूधसागर पाहावयास गेल्यास पर्यटकांना न्यायालयाचेही दर्शन घ्यावे लागणार आहे. न्यायालयात गुन्हा शाबित झाल्यास दोषी पर्यटकाला कारागृहाची हवा खावी लागेल. पावसाळ्यात प्रत्येक रविवारी बेळगाव, हुबळीसह इतर ठिकाणांहून सुमारे अडीच ते तीन हजार पर्यटक भेट देत होते.

काही अतिउत्साही पर्यटकांमुळे दूधसागर पर्यटनाला गालबोट लागले. अनेकजण दूधसागरात वाहून गेल्याने या दुर्घटना टाळण्यासाठी वन खात्याने याठिकाणी पर्यटनाला बंदी घातली. प्रारंभीच्या काळात सक्त कारवाई करीत पर्यटकांना कॅसलरॉक येथूनच माघारी पाठविण्यात आले होते. यासाठी गोवा पोलिस आणि रेल्वे पोलिसांची मदत घेण्यात आली होती.

दोन वर्षे उलटल्यानंतर आता पुन्हा कारवाई थंडावल्याने पर्यटकांना दूधसागरने आकर्षित केले होते. यामुळे पुन्हा रेल्वेने दूधसागरला पर्यटक जाण्याच्या संख्येत वाढ झाली होती. यामुळे गोवा पोलिस वनखात्याच्या कर्मचाऱ्यांसोबत पर्यटकांच्या वादावादीच्याही घटना घडल्या होत्या. त्यातच रेल्वे रुळावर वाघ आणि बिबट्या दिसल्याने रेल्वे खात्याने पर्यटकांना खबरदारीची सूचना केली होती.

मागील महिन्यातच रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला होता. पण, तरीही पर्यटकांकडून दूधसागरला भेट दिली जात असल्याने आता पर्यटकांना बंदीसाठी रेल्वेने आपल्या कायद्याचा वापर केला आहे. दूधसागर रेल्वे स्थानकावरच याबाबतचा इशारा देणारे सूचना फलक बसविण्यात आले आहे. 

काय आहे, कलम १४७?
भारतीय रेल्वे कायदा १९८९ मध्ये कलम १४७ चा समावेश आहे. रेल्वेच्या संपत्तीमध्ये विनापरवाना दाखल होणे, संपत्तीचा गैरवापर करणे, इशारा देऊनही तेथून न हटणे यासाठी या कलमाचा आधार घेतला जातो. दोषीला सहा महिन्याचा कारावासची शिक्षा, एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही सुनावले जाऊ शकते.

Web Title: ban on tourist visit to Dudhasagar