esakal | बंगळूर पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

बंगळूर पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु

बंगळूर पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बंगळूर: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचे बसवराज बोम्मई यांचे हे पहिलेच अधिवेशन आहे. विरोधी पक्षांनी सरकारला विविध मुद्द्यांवर अडचणीत आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बोम्मई यांच्यासमोर हे अधिवेशन एक आव्हान ठरणार आहे.

हेही वाचा: "CM नहीं PM बदलो! मुख्यमंत्री बदलण्याने मोदींचं अपयश झाकणार नाही"

सहा महिन्यानंतर अधिवेशन होत आहे. दहा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात ऑनलाईन जुगारावर बंदी, कर्नाटक पोलीस कायद्यात दुरुस्ती यासह अलीकडेच जारी करण्यात आलेल्या चार अध्यादेशांचे मसुदे व मंजुरी न मिळालेली विधायके अशी एकूण १८ विधायक विधिमंडळात चर्चेला येणार आहेत. यावेळी सरकारच्या विविध चुका सभागृहात मांडून सरकारला अडचणीत आणण्याची विरोधी पक्षांची व्यूहरचना आहे.

पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसमध्ये झालेली भरमसाठ वाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती, कोरोना नियंत्रणात सरकारला आलेले अपयश, म्हैसूरमधील सामूहिक अत्याचार, जातीनिहाय जनगणणा, पूरग्रस्तांच्या समस्या, राज्यात ढासळलेली कायदा व सुव्यवस्था यांसह इतर विषय उपस्थित करून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांचा राहणार आहे.

याचबरोबर राज्यातील नेतृत्व बदलाचा विषय, मंत्रिमंडळ पुनर्रचनेत निर्माण झालेला गोंधळ, खातेवाटपातून मंत्र्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी मंत्रिमंडळात सामील होण्यास दिलेला नकार, भाजपतील अंतर्गत मतभेद आदी विषयांचेही पडसाद सभागृहात उमटण्याची शक्यता आहे. बी. एस. येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात विरोधी पक्षांच्या टीकेला ढालीप्रमाणे सामोरे जात प्रत्युत्तर देण्यास सरसावणारे बोम्मई आता स्वतः मुख्यमंत्री म्हणून विरोधी पक्षांच्या टीकेला कसे सामोरे जाणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

विरोधी पक्षांच्या आव्हानांना तेवढ्याच समर्थपणे सामोरे जाण्याची तयारी सत्ताधारी भाजपनेही केली आहे. विरोधी पक्षातील संघटनेच्या अभावाचा लाभ घेण्याचा विचार सत्ताधारी पक्षाचा आहे. विरोधी पक्ष सभागृहात उपस्थित करणाऱ्या प्रत्येक विषयावर तेवढेच समर्पक उत्तर देऊन, त्यांचे आरोप फेटाळून लावण्याची तयारी मंत्रिमंडळाने केली आहे. त्यामुळे या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधी पक्षात वाद-विवाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धजदच्या भूमिकेकडे लक्ष

राज्य विधिमंडळातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करणार हे निश्चित आहे. परंतु धजद पक्ष कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अलीकडच्या काळात धजदने सत्ताधारी पक्षाशी कांही बाबतीत तडजोडीची भूमिका घेतली आहे.

आम्ही सरकारच्या अपयशांवर प्रकाश टाकणार आहोत. वाढती महागाई, कोरोनाचा सामना, दुसऱ्या लाटेदरम्यानची मृत्यूंची संख्या, रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवण्यात सरकारचे अपयश, राज्याची आर्थिक स्थिती, एनईपी, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणि इतर महत्त्वाचे मुद्दे सत्रादरम्यान घेतले जातील. - सिद्दरामय्या, माजी मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते

आम्ही काही दुरुस्त्यांसह १८ विधेयके सादर करत आहोत. सहा महिन्यानंतर अधिवेशन होत असल्याने विधेयकांची संख्या अधिक आहे. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. प्रत्येक विधेयकावर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ असेल. आम्ही विरोधी पक्षांना वेळ द्यायला तयार आहोत, फक्त त्यांनी भाग घेतला पाहिजे. हेतुपुरस्सर सभागृहात व्यत्यय आणला तर आम्ही काहीही करू शकत नाही. - जे. सी. माधूस्वामी, कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री

loading image
go to top