बंगळूरमध्ये गरिबांसाठी काँग्रेसचे "इंदिरा कॅंटीन'

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

बंगळूर: गरिबांमधील गरिबांना परवडेल अशा दरात अन्न पुरविण्यासाठी "इंदिरा कॅंटीन'चे उद्‌घाटन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते बंगळूरमध्ये बुधवारी करण्यात आले.

बंगळूर: गरिबांमधील गरिबांना परवडेल अशा दरात अन्न पुरविण्यासाठी "इंदिरा कॅंटीन'चे उद्‌घाटन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हस्ते बंगळूरमध्ये बुधवारी करण्यात आले.

"इंदिरा कॅंटीन' हा उपक्रम म्हणजे कर्नाटकला "भूकमुक्त' राज्य बनविण्याच्या दिशेने एक पाऊल असल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या वेळी सांगितले. सिद्धरामय्या यांनी चार वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा एक रुपयात तांदूळ वाटपाचा प्रारंभ केला होता. बंगळूरमधील प्रत्येक वॉर्डमध्ये एक अशी 198 कॅंटीन सुरू करण्याचे उद्दिष्ट असून सध्या 101 कॅंटीन आहेत. येथे नाश्‍ता पाच रुपयांना तर जेवण दहा रुपयांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुरवातीला दररोज 500 नागरिक या सेवेचा लाभ घेतील. नंतर मागणीनुसार ही संख्या वाढेल, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

या उपक्रमाबद्दल राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ""कर्नाटकमधील सर्व शहरांमध्ये "इंदिरा कॅंटीन' सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, अन्नापासून कोणीही वंचित राहू नये, हा त्यामागील उद्देश आहे. देशातील सर्व नागरिकांना झोपण्यापूर्वी पोटभर जेवण मिळावे, असे स्वप्न दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे होते.''

"नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याने येथील पदार्थ आरोग्यदायी असावेत, तसेच त्याची गुणवत्ता कायम ठेवावी,'' असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले. अन्न हा देशातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असल्यावर भर देत अशा प्रकारचे उपक्रम देशपातळीवर नेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मजूर, रिक्षाचालक, ज्येष्ठ नागरिक व कामासाठी कर्नाटकमध्ये भेट देणारे नागरिक ज्यांना हॉटेलमध्ये जास्त पैसे देऊन खाणे शक्‍य नाही त्यांसाठी "इंदिरा कॅंटीन'ची सेवा उपयुक्‍त ठरणार आहे, असेही राहुल गांधी सांगितले.

"अम्मा की इंदिरा कॅंटीन'
कर्नाटक सरकारने सुरू केलेल्या "इंदिरा कॅंटीन' या उपक्रमाचे उद्‌घाटन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केले. त्या वेळी बोलताना त्यांनी याचा "अम्मा कॅंटीन' असा उल्लेख केला. ते म्हणाले की, सर्वांनी "अम्मा कॅंटीन'चा वापर केला पाहिजे. मात्र लगेचच त्यांनी ही चूक सुधारून "इंदिरा कॅंटीन' असे म्हटले. त्यामुळे उपस्थितांमध्ये खसखस पिकली. या वेळी राहुल व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथील भोजनाचा आस्वाद घेतला. ""ही एक सुरवात आहे. काँग्रेस सरकारने याचा प्रारंभ केला ही आनंदाची गोष्ट आहे, असे सांगत काही दिवसांनी भाजपचे नेतेही येथे जेवताना तुम्हाला दिसतील,'' अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

Web Title: banglore news congress indira canteen rahul gandhi