बॅंका फसल्या तोट्याच्या गाळात

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 13 मे 2018

बॅंकिंग क्षेत्र अतिशय वाईट परिस्थितीत आहे. सहा सरकारी बॅंकांना साडेसोळा हजार कोटी रुपये तोटा झाला असल्याने जनतेचा पैसा सुरक्षित आहे काय आणि हेच अच्छे दिन आहेत काय? 
- रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते, कॉंग्रेस 

 

नवी दिल्ली - देशभरातील बॅंकांची आर्थिक परिस्थिती अजूनही सुधारण्याची चिन्हे नाहीत. मागील आर्थिक वर्षाची अखेर बॅंकिंग क्षेत्रासाठी त्रासदायक ठरली असून, 2017-18 या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीमध्ये (जानेवारी ते मार्च) फक्त सहा प्रमुख बॅंकांचा तोटा तब्बल सोळा हजार कोटी रुपये झाला आहे. त्याआधीच्या तिमाहीमध्ये (ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर) 21 सरकारी बॅंकांचा तोटा 18 हजार 097 कोटी रुपये होता. 

तोटा झालेल्या सरकारी बॅंकांमध्ये युनियन बॅंक, युको बॅंक, कॅनरा बॅंक, अलाहाबाद बॅंक, देना बॅंक, ओरिएन्टल बॅंक ऑफ कॉमर्स यांचा समावेश आहे. दरम्यान, खासगी बॅंकांच्या नफ्यामध्येदेखील मोठी घसरण झाली आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार कॅनरा बॅंक, अलाहाबाद बॅंकेला चौथ्या तिमाहीमध्ये सर्वाधिक तोटा झाला आहे. दोन्ही बॅंकांचा तोटा अनुक्रमे 4 हजार 860 कोटी रुपये आणि 3 हजार 510 कोटी रुपये आहे, तर युनियन बॅंकेला 2 हजार 583 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. युको बॅंकेचा तोटा 2134.36 कोटींवर गेला आहे. "ओरिएन्टल बॅंक ऑफ कॉमर्स'चा तोटा 1650.22 कोटी रुपये झाला आहे. या सहा बॅंकांचा एकूण तोटा 15,962.58 कोटी रुपये असून, ही रक्कम तिसऱ्या तिमाहीतील 21 सरकारी बॅंकांच्या एकत्रित तोट्याच्या जवळपास पोचली आहे. त्यामुळे सर्व 21 बॅंकांच्या तोट्याची रक्कम मोठी असण्याची चिन्हे आहेत. बॅंक गैरव्यवहार प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या "पंजाब नॅशनल बॅंके'च्या आकडेवारीकडेही बॅंकिंग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

नफाही कमी 

दरम्यान, ऍक्‍सिस बॅंकेला 2188 कोटी रुपये आणि देना बॅंकेला 1225 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, तर याव्यतिरिक्त आयसीआयसीआय बॅंकेच्या नफ्यामध्ये 45 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. खासगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बॅंक असलेल्या "आयसीआयसीआय'चा नफा 2083 कोटी रुपयांवरून 1142 कोटी रुपये एवढा खाली आला आहे. इंडियन बॅंकेचाही नफा 58.7 टक्‍क्‍यांनी घसरला असून, या बॅंकेला केवळ 132 कोटी रुपयेच फायदा झाला आहे. सर्वाधिक घसरण आयडीएफसी बॅंकेच्या नफ्यात झाली आहे. या बॅंकेचा नफा 76 टक्‍क्‍यांनी (859.30 कोटी रुपये) खाली आला आहे. 
 

Web Title: bank suffering in huge loss