नोटा बदलण्यासाठी  बॅंकांमध्ये गर्दीच गर्दी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

तब्बल २२०३ कोटी नोटा नष्ट करणार

चलनातून रद्द करण्यात आल्याने रिझर्व्ह बॅंकेकडून पाचशे आणि हजाराच्या तब्बल २२०३ कोटी नोटा नष्ट केल्या जाणार आहेत. बॅंकेच्या आकडेवारीनुसार ३१ मार्चअखेर बाजारात ९०२६.६ कोटी नोटा असून, यातील २४ टक्के नोटा पाचशे आणि हजार रुपयांच्या आहेत. या नोटा रीतसर नष्ट करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. याआधी बॅंकेकडून या नोटा बनावट आहेत का? याचीदेखील खात्री केली जाणार आहे.

मुंबई/नवी दिल्ली - पाचशे आणि हजारांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याने गुरुवारी राज्यासह देशभरातील बॅंकांची अक्षरश: तारांबळ उडाली. सर्वच बॅंकांसमोर पहाटेपासून नागरिकांनी लांबच्या लांब रांगा लावल्या. नोटा बदलण्यासाठी आणि रोख खात्यात जमा करण्यासाठी ओळखपत्र द्यावे लागत असल्याने अनेक ठिकाणी बॅंक कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वादाच्या ठिणग्या पडल्या.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी (ता. ८) रात्री पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बॅंकांकडून अंतर्गत यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी बुधवारी (ता. ९) सेवा बंद ठेवण्यात आली; मात्र तरीही ही परिस्थिती हाताळताना बॅंकांची दयनीय अवस्था झाली. नागरिकांचा प्रचंड लोंढा बॅंकांवर सकाळपासूनच धडकला. नोटा बदलण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. बॅंकांच्या कार्यपद्धतीमुळे नोटा बदलताना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला. बहुतांश खासगी आणि सार्वजनिक बॅंकांनी कामकाज दोन तासांनी वाढवले. सहकारी बॅंका आणि पतपेढ्यांमध्येही खातेधारकांनी आणि सामान्यांनी नोटा बदलण्यासाठी गर्दी केली होती. वादाचे प्रसंग उद्‌भवू नयेत, यासाठी अनेक बॅंकांबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

एटीएममध्ये रोकड उपलब्ध केल्याचा बॅंकांचा दावा गुरुवारी फोल ठरला. रोकडअभावी शहरातील बहुतांश बॅंकांच्या एटीएम मशिनमध्येही खडखडाट पडल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी दिसून आले. काही ठिकाणी कॅश डिपॉझिट मशिन्सदेखील बंद होत्या. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

दिल्लीकरांची धावाधाव

मोदी सरकारने बाद केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी सामान्य दिल्लीकर आज दिवसभर अक्षरशः वणवण भटकत राहिले; मात्र बॅंकांनी आपल्याच खाक्‍या चालविताना ‘नोटा संपल्या, वेळ संपली, लंच टाइम’ अशा सबबी पुढे केल्याने रांगा वाढतच गेल्या. रात्री ८ पर्यंत बॅंकांची कामकाज वेळ वाढविल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले; पण या बॅंकेच्या संसद मार्गावरील शाखेनेही तो निर्देश जुमानला नाही व सायंकाळपूर्वीच शटर डाउन केले. 

अनेक दिल्लीकरांनी आज सकाळचा ‘मॉर्निंग वॉक’ चक्क नजीकच्या बॅंक शाखांपर्यंत वाढविला. सकाळी ६ पासूनच बॅंकांसमोर रांगा लागल्या व दिवसभरात त्या वाढतच गेल्या; मात्र नव्या नोटांचा पुरेसा साठा करण्याच्या आपत्ती व्यवस्थापनात अनेक बॅंका सपशेल कमी पडल्या. कॅनरा बॅंकेसह कित्येक बॅंकांनी दुपारीच नोटा संपल्याचे जाहीर केले. बॅंकांसमोर गोंधळ होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने दिल्लीतील प्रमुख बॅंकांवर आज जादा पोलिस दल तैनात केले होते. दिल्ली व परिसरात १००० निमलष्करी जवान व २०० शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात होत्या. बॅंक ऑफ इंडियाच्या पार्लमेंट स्ट्रीट शाखेने सायंकाळीच शटर डाउन केले, तेव्हा बॅंकेसमोर नोटा बदलून घेणाऱ्यांची गर्दी कायम होती. यातील काहींनी वाद घालताच बॅंक अधिकाऱ्यांनी, दिल्लीचे निर्देश आम्हाला माहिती नाही, आम्ही सर्क्‍युलरवर चालतो व आमच्या मुंबईतील मुख्यालयाने सायंकाळी नेहमीच्याच वेळेत बॅंक बंद करा, असे निर्देश दिले आहेत, असे सुनावले. यावर पुन्हा वाद होताच, या अधिकाऱ्याने बंदूकधारी शिपायास पाचारण केल्याने गोंधळ आणखी वाढला. 

Web Title: Banks rush to change the currency