#DecodingElections : आताशी संघर्ष सुरू झालाय.. शेवट कुठे? 

मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पाच वर्षांपूर्वी देशातल्या राजकीय पटलावर सुरू झालेलं 'युद्ध' अजूनही संपलेलं नाही. किंबहुना, आजच्या निकालांनंतर हे युद्ध अजून पेटणार आहे.

2014 ची निवडणूक देशात अनेकार्थांनी 'गेम चेंजर' होती. नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणातील उदय, अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा चौफेर उधळलेला विजयरथ आणि सततच्या पराभवामुळे हताश झालेली काँग्रेस हेच गेल्या चार वर्षांमधील देशातलं राजकीय चित्र होतं. पण विषय तो नाही.. आम्हा माध्यमांना कुठलंही चित्र दणक्‍यात उभं करण्याची खोड आहे. 

विराट कोहलीचा भारतीय संघ परदेशात एक सामना जिंकला, की 'हेच जगज्जेते' या थाटात आम्ही कौतुकाचे इमले बांधतो.. पुढचा सामना हारला, की 'कोहली-शास्त्रीचं कसं चुकतंय' म्हणून दगडं घेऊन धावतो.. जे चित्र क्रिकेटसाठी, तेच राजकारणासाठी! देशात मोदींचा उदय झाल्यानंतर समस्त माध्यमविश्‍व दुभंगलं.. निधर्मी, निर्भीड, नि:पक्षपाती वगैरे असलेल्या ज्येष्ठ-वरिष्ठ पत्रकारांना वैयक्तिक मत आणि 'फॅक्‍ट्‌स'मध्ये फरक कसा करता येत नाही इथपासून स्वत:चे अजेंडे रेटण्यासाठी एखाद्या घटनेचा वापर कसा करायचा याचं ढळढळीत प्रात्यक्षित गेल्या चार वर्षांत पाहता आलं.. 

'एनडीटीव्ही', 'द वायर', 'क्विंट'सारखी माध्यमं उघडपणे भाजपच्या विरोधात असल्याचे चित्र जसं दिसायला लागलं, तसंच 'रिपब्लिक', 'एबीपी' आणि 'झी न्यूज'सारख्यांनी भाजपची कास धरल्याचंही दिसत होतंच.. हे चित्र अस्वस्थ करणारं आहे.. 'ऍवॉर्ड वापसी'च्या काळातला शाहरुख खानचा तो वादग्रस्त व्हिडिओ आठवतोय का? 'इन्टॉलरन्स आधीही होताच; आता तुम्हा माध्यमांचा आवाज वाढलाय म्हणून जास्त ऐकू येतंय' असं शाहरुख म्हणाला आणि ज्येष्ठ संपादकांच्या मुलाखतीच्या कौशल्यामुळे 'शाहरुखही म्हणतो देशात असहिष्णूता वाढली आहे' असा 'संदेश' योग्य पद्धतीने पोचवण्यात आला. दुसरीकडे, ज्या मुलाखतीमुळे राहुल गांधींची प्रतिमा 'पप्पू' अशी झाली, त्याचे 'प्रोजेक्‍शन'ही व्यवस्थित करण्यात आले. बरखा दत्त यांच्यापासून अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंतचे ज्येष्ठ आणि प्रसिद्ध चेहरे कुठल्या कंपूत आहेत, हे सर्वसामान्य वाचकालाही कळण्याइतपत ही वर्गवारी उघड झाली आहे. 

आताही हाच खेळ पुन्हा सुरू झाला आहे.. राजकीय पक्षांचं युद्ध आता माध्यमांमध्ये खेळलं जाऊ लागलं आहे.. भाजपच्या बाजूचे आणि काँग्रेसच्या बाजूचे किंवा भाजपच्या विरोधातले असे दोन कंपू निर्माण झाले.. किंवा उघडपणे समोर आले..! गेल्या चार वर्षांमध्ये भाजपने एकामागून एक राज्यं जिंकत जवळपास संपूर्ण भारत व्यापला. त्यावेळी विरोधी पक्ष गडबडून गेले. त्यातून सावरायला काँग्रेसला चार वर्षं लागली. अर्थात, राजकीय पक्षांची वाटचाल कॅलेंडरच्या पानांवर मोजायची नसते हेही तितकंच खरं आहे. राजकारणामध्ये चार वर्षं म्हणजे फार मोठा कालावधी नाही. त्यामुळे एका निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष संपत नाही. तसं असतं, तर वर्षानुवर्षं सत्तेबाहेर राहूनही भाजप टिकून राहिला नसता आणि इतका वाढलाही नसता. त्यामुळे 2014 च्या निकालानंतर काँग्रेस नीचांकी पातळीवर जाऊनही संपली नाही आणि स्वबळावर बहुमत आणल्यानंतर भाजपही अजिंक्‍य ठरलेला नाही. 

काँग्रेसला पुनरागमनाचा मार्ग सापडला आहे, असं म्हणण्यासारखा निकाल आज लागला आहे. त्यामुळे आता पुढच्या पाच महिन्यांमध्ये एका मोठ्या युद्धाला तोंड फुटेल.. एकीकडे मोदीविरोधकांना स्वत:च्या झेंड्याखाली एकत्र आणून देशभरात आव्हान देण्याची रणनिती जोरात सुरू होईल.. त्यात मायावती, ममता बॅनर्जी यांचे रुसवे-फुगवे, अखिलेश आणि मुलायमसिंह यादव यांच्यातील ओढाताण आणि शिवसेना, अकाली दलांसारख्या स्थानिक पक्षांची संभाव्य दिशा यावर जोरदार मारामारी होईल.. 

दुसरीकडे, पाच राज्यांमधील पराभवावर पांघरुण घालण्यासाठी भाजप अधिक आक्रमक होईल.. कदाचित राम मंदिरासारखे विषय पुन्हा जोरात अजेंड्यावर येतील. कारण भाजप अडचणीत सापडल्याची संधी साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्‍व हिंदू परिषदेसारख्या संघ परिवारातील संघटना पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्यावर अधिक आक्रमक होतील.. गेल्या निवडणुकांमध्ये चाललेलं नरेंद्र मोदी हे नाणं अजूनही चलनात आहे की नाही, यावर सगळा भाजपचा सगळा खेळ अवलंबून असेल.. 

हे सगळं होईल.. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा खेळ वेगळ्या मैदानावर सुरू होतोय.. हा खेळ खेळला जाईल माध्यमांमधून.. मोदी समर्थक आणि मोदी विरोधक अशा भूमिकांचे नि:पक्षपाती पत्रकार जोमात येतील.. आजपासून सुरू झालेला हा खेळ लोकसभेचा निकाल लागेपर्यंत सुरू असेल.. आतापर्यंत भाजपच जोमात असल्यामुळे हा सामना एकतर्फी होता.. आता प्रतिस्पर्धीही बलवान होतोय.. राजकारण आणि माध्यमे अशा दोन मैदानांवर एकाच वेळी संघर्ष सुरू झालाय.. याचा शेवट कशात होईल..?

Web Title: The battle;e of congress has just begin,there is a long way to go writes Gaurav Divekar