राममंदिरास विरोध केल्यास शिरच्छेद करु: भाजप आमदार

वृत्तसंस्था
रविवार, 9 एप्रिल 2017

राममंदिर बांधल्यास गंभीर परिणाम होतील, अशी वल्गना करणाऱ्यांनी हे समजून घ्यावे - तुम्ही असे काही विधान करावे, याची आम्ही वाटच पाहत होतो. राममंदिरास विरोध करणाऱ्यांचा आता शिरच्छेद केला जाईल

नवी दिल्ली - अयोध्या येथे राम मंदिर बांधण्यास विरोध करणाऱ्यांचा शिरच्छेद केला जाईल, अशी दर्पोक्‍ती भारतीय जनता पक्षाचे (भाजप) हैदराबाद येथील आमदार राजा सिंह यांनी केली आहे.

"राममंदिर बांधल्यास गंभीर परिणाम होतील, अशी वल्गना करणाऱ्यांनी हे समजून घ्यावे - तुम्ही असे काही विधान करावे, याची आम्ही वाटच पाहत होतो. राममंदिरास विरोध करणाऱ्यांचा आता शिरच्छेद केला जाईल,'' असे सिंह म्हणाले. सिंह यांनी याआधीही अशा प्रकारे वादग्रस्त विधाने केली आहेत. याआधी डिसेंबर 2015 मध्ये त्यांनी गोसंरक्षणासाठी हत्या करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे म्हटले होते.

काल (शनिवार) भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही राममंदिराच्या निर्मितीसाठी तुरुंगात जाण्यासही तयार असल्याचे म्हटले होते. उत्तर प्रदेश राज्यामध्ये भाजपला मोठा विजय मिळाल्यानंतर राममंदिराचा मुद्दा अधिक प्रकर्षाने मांडला जात असल्याचे आढळून आले आहे.

Web Title: Behead those who oppose the construction of Ram temple, says BJP MLA