उत्तर प्रदेशातील दंगलीमागे संघ, विहिंप आणि बजरंग दल: भाजप मंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात कथित गोहत्येच्या संशयावरुन काल सोमवारी (ता. 03) झालेल्या दंगलीत आरएसएस, विहिंप आणि बजरंग दलाचा हात असल्याचा गौफ्यस्फोट उत्तर प्रदेशातील योगी सरकारचेच मंत्री असलेल्या ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे. यामुळे आता पोलिसांनी भाजप नेत्यांवरही संशय घेण्यास सुरवात केली आहे.

लखनौ- उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात कथित गोहत्येच्या संशयावरुन काल सोमवारी (ता. 03) झालेल्या दंगलीत आरएसएस, विहिंप आणि बजरंग दलाचा हात असल्याचा गौफ्यस्फोट उत्तर प्रदेशातील योगी सरकारचेच मंत्री असलेल्या ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे. यामुळे आता पोलिसांनी भाजप नेत्यांवरही संशय घेण्यास सुरवात केली आहे.

दरम्यान, या दंगलीमागच्या मुख्य सुत्रधाराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या दंगलीप्रकरणी आतापर्यंत 75 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दंगलीतील मुख्य सुत्रधारासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या मुख्य सूत्रधाराचे नाव योगेश राज आहे.

कथित गोहत्याच्या कारणावरून काल उत्तरप्रदेशमध्ये (ता. 03) मोठा भडका उडाला होता. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह दोन जणांचा मृत्यू झाला होता. अवैध कत्तलखान्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांनी येथील पोलिस स्थानकाला पेटवून दिल्याची ही घटना होती. मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आल्यानंतर एका पोलिस व्हॅनलाही येथे आग लावण्यात आली होती.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये योगेश राज याचे नाव आहे. योगेश राज याने आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून जमावाला भडवले, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. योगेश राजसोबत उपेंद्र राघव, शिखर अग्रवाल यांचीही नावेही पोलिस अधिकारी सुबोध सिंह यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांमध्ये आहेत.

याचदरम्यान देवेंद्र, चमन आणि आशीष चौहान यांना अटक करण्यात आली आहे.  बुलंदशहर जिल्ह्यातील स्यानामधील एका गावात शेतात गोवंशाचे अवशेष आढळले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोलिस आणि जमावामध्ये वादावादी झाली होती.

Web Title: behind Uttar Pradesh riots Rss, VHP and Bajrang Dal says BJP minister