देशभक्त असल्याने भागवत राष्ट्रपदीपदासाठी योग्य; काँग्रेस नेत्याचे मोदींना पत्र

वृत्तसंस्था
रविवार, 2 एप्रिल 2017

"मला असे वाटते की मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी निवडले तर त्याला कोणाचीही हरकत नसावी. त्यांची देशभक्ती, देशवासियांवरील प्रेम, देशाप्रतीचा प्रामाणिकपणा, भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीबाबतची निष्ठा याबाबत काहीही शंका नाही', अशा शब्दांत त्यांनी मोदींना लिहिलेल्या पत्राद्वारे भागवत यांची स्तुती केली आहे.

बंगळूर (कर्नाटक) : शिवसेनेने राष्ट्रपतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव समोर आणत त्यांना पाठिंबा दर्शविला होता. मात्र, राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे म्हणत भागवत यांनी ही शक्‍यता फेटाळून लावली आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते जाफर शरीफ यांनी "देशभक्त असल्याने भागवत राष्ट्रपतीपदासाठी योग्य आहेत', अशा आशयाचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना शरीफ म्हणाले, "ज्यावेळी मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतीसाठी असल्याचे वृत्त मला समजले, त्यावेळी मी त्यावर विचार केला. ते राष्ट्रपती का होऊ शकत नाहीत? देशातील अल्पसंख्यांक समुदाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध असल्याची शंका उपस्थित करण्यात येते. मला लोकांच्या मनातील ही शंका दूर करायची आहे. मला लोकांना सांगावेसे वाटते की सर्वजण सारखेच आहेत. राष्ट्रविकास करणे आणि देशाचे रक्षण करणे ही फार मोठी जबाबदारी आहे. मला वाटते की मोहन भागवत हे देशभक्त असल्याने ते ही जबाबदारी सक्षमपणे पार पाडू शकतील.' शरीफ यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहिले आहे. "मला असे वाटते की मोहन भागवत यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी निवडले तर त्याला कोणाचीही हरकत नसावी. त्यांची देशभक्ती, देशवासियांवरील प्रेम, देशाप्रतीचा प्रामाणिकपणा, भारतीय राज्यघटना आणि लोकशाहीबाबतची निष्ठा याबाबत काहीही शंका नाही', अशा शब्दांत त्यांनी मोदींना लिहिलेल्या पत्राद्वारे भागवत यांची स्तुती केली आहे.

येत्या 25 जुलै रोजी विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. दरम्यान उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्याने भाजपने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे.

Web Title: Being a patriot Mohan Bhagwat will suitable for President : Congress leader