...म्हणून ट्विटरवर #बेळगावमहाराष्ट्राचे ट्रेंड!

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

- बेळगावसह सीमाभागात  1 नोव्हेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो.

पुणे : कर्नाटकचा स्थापना दिवस म्हणजे 1 नोव्हेंबर. बेळगावसह सीमाभागात हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो. आजच्याच दिवशी निपाणी, बेळगाव, गुलबर्गा, भालकी आणि बिदर मराठी भाषिक भाग आणि 814 गावे कर्नाटकात सामील करण्यात आली होती. त्यानंतर आता या दिवसाच्या निषेधार्ध ट्विटरवर सध्या #बेळगावमहाराष्ट्राचे हा ट्रेंड सुरु आहे.

या दिवसाच्या निषेधार्थ बेळगावसह सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज काळा दिवस पाळण्यात येत आहे. निपाणी, बिदर, भालकी, बेळगाव, कारवारसह संपूर्ण बेळगाव परिसर संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या घोषणांनी दणाणून गेला. सीमाप्रश्नी मराठी जनता रस्त्यावर उतरली.

'बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही', यांसारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

त्यानंतर आता ट्विटरवर #बेळगावमहाराष्ट्राचे हा ट्रेंड सुरु आहे. नेटीझन्सकडून ट्विटही करण्यात आले. यामध्ये कर्नाटकच्या जनतेला कन्नड राज्योत्सव दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पण बेळगाव हा भाग मराठी लोकांसंबंधी येतो. त्यामुळे त्यांना त्यांचे महाराष्ट्रातील स्वातंत्र्य त्यांच्या पंरपरेनुसार व्यतित करता यावे, अशाप्रकारे ट्विट करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum belongs to Maharashtra Trends on Twitter