खड्ड्यांवरून बेळगाव महापालिका सभेत गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

बेळगाव - काँग्रेस रोडवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी पीठासनासमोर जावून आंदोलन केल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत गोंधळ झाला.

बेळगाव - काँग्रेस रोडवरील खड्ड्यांच्या निषेधार्थ सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी पीठासनासमोर जावून आंदोलन केल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत गोंधळ झाला. सत्ताधारी गटनेते संजय शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली व काँग्रेस रोड दुरूस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली.

यावेळी काँग्रेस रोडवरील खड्डे, महापौरानी केलेल्या पाहणीचे छायाचित्र असलेला फलक घेवून सत्ताधारी नगरसेवक पीठासनासमोर गेले. पाहणीवेळी महापौरांच्या अंगावर चिखल उडाला, पाहणीनंतरही रस्ता दुरूस्ती झाली नाही असा आरोप त्यानी केला. सत्ताधारी नगरसेवकांच्या या आंदोलनाला विरोधी गटनेते दीपक जमखंडी व नगरसेवकांनी आक्षेप घेतला.

काँग्रेस रोड पहिल्यांदाच नादुरूस्त झालेला नाही. त्यामुळे यासाठी फलक घेवून आंदोलन करण्याची गरज नाही असे ते म्हणाले. यावरून सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. काँग्रेस रोड हा एका नगरसेवकाचा विषय नाही, त्यामुळे महापौरानी पाहणी केल्यानंतरही प्रशासनाने दुरूस्ती काम का केले नाही?

असा सवाल पंढरी परब, माजी महापौर किरण सायनाक, रतन मासेकर यांनी केला. या आरोपाला आयुक्त शशीधर कुरेर यांनी उत्तर दिले. पावसामुळे व अन्य काही कारणांमुळे रस्ते नादुरूस्त झाले आहेत. दोषदायीत्व कालावधी पूर्ण न झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती संबंधित ठेकेदारांकडून करून घेतली जाईल.

गणेशोत्सवाच्या आधी खड्डे भरले जातील, काँग्रेस रोडचे काँक्रीटीकरण 30 कोटी रूपये खर्च करून केले जाईल असे आयुक्तानी सांगितले. ठेकेदाराना नोटीस बजावण्याची सूचना बांधकाम स्थायी समितीने दिला होता, त्यावर अद्याप कार्यवाही का झाली नाही अशी विचारणा मोहन भांदुर्गे यानी केली. त्यावर ठेकेदार व खोदाई केलेल्या संबंधित शासकीय विभागाना नोटीस बजावल्याचे अधिक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यानी सांगितले.

रस्ता दुरूस्तीसाठी अतिरिक्त दोन कोटी रूपये मंजूर करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जाईल असे सांगून महापौरांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण सायनाक व परब यानी पुन्हा खड्ड्यांचा विषय उपस्थित केला. दोषदायीत्व कालावधी पूर्ण झालेल्याच रस्त्यांवरील खड्डे भरा अन्य रस्त्यांवरील खड्डे भरू नका अशी मागणी त्यानी केली.

Web Title: Belgaum Corporation General Meeting