बेळगाव महापालिकेची निवडणूक लांबणीवर

बेळगाव महापालिकेची निवडणूक लांबणीवर

बंगळूर - राज्य निवडणूक विभागाने नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक जाहीर केली आहे. मार्च ते जुलै २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १०३ पैकी ६३ नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक येत्या २९ मे रोजी होणार आहे.

दरम्यान, बेळगावसह रामनगर, कोडगू, गुलबर्गा महापालिका व नगरपलिकांची याचिका उच्च न्यायालयात दाखल झालेली असल्याने त्यांची निवडणूक जाहीर केलेली नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त पी. एन. श्रीनिवासचारी यांनी दिली.

गतवर्षी पहिल्या टप्यात १०९ स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक झाली होती. दुसऱ्या टप्यात १०३ नगर संस्थांची निवडणूक घेणे आवश्‍यक होते. परंतु, काही संस्थांनी प्रभाग पुनर्रचना व प्रभाग आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिल्याने अशा संस्थांना वगळून अन्य ६३ नगर स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक जाहीर केली आहे.

२२ जिल्ह्यांतील ८ नगरपालिका, ३३ नगरसभा व २२ नगरपंचायतींचा यामध्ये समावेश असून नगरपलिकेचे २४८ सदस्य, नगरसभेचे ७८३ व नगर पंचायतीचे ३३० अशा एकूण १,३६१ प्रभागांत निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी ९ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तर तालुका पंचायतींच्या १० व ग्रामपंचायतींच्या २०२ रिक्त जागांसाठीही याच दिवशी मतदान होणार असून ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी १३ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.

दरम्यान, सर्व ६३ स्थानिक संस्थांतून १४ लाख ७४ हजार ८६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी १,६४६ मतदान केंद्रे असून ८,२३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे, अशीही माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली.

मार्च ते जुलैदरम्यान आणखी ३९ नगर स्थानिक स्वराज संस्थांची मुदत संपणार आहे. काहींची मुदत यापूर्वीच संपलेली आहे. परंतु, या नगर संस्थांच्या प्रभाग पुनर्रचना व प्रभाग आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिल्याने त्यांना वगळून बाकी ६३ संस्थांची निवडणूक जाहीर झाली आहे. कुंदगोळ विधानसभेची १९ मे रोजी पोटनिवडणूक होणार असल्याने या नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झालेली नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम

  •  निवडणुकीची अधिसूचना     ९ मे
  •  उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस     १६ मे
  •  अर्जांची छाननी     १७ मे
  •  उमेदवारी मागे घेण्याची तारीख     २० मे
  •  मतदान     २९ मे
  •  आवश्‍यक वाटल्यास फेर मतदान     ३० मे
  •  मतमोजणी     ३१ मे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com