बेळगाव महापालिकेत कन्नडिंगांचा धिंगाणा

बेळगाव महापालिकेत कन्नडिंगांचा धिंगाणा

मराठी महापौरांच्या फलकाला काळे फासले; सहा जणांना अटक
बेळगाव - मराठी भाषकांचा काळा दिन अभूतपूर्व गर्दीत यशस्वी झाल्यामुळे पोटशूळ उठलेल्या कन्नड संघटनांनी आज महापालिकेत धिंगाणा घालताना मराठी भाषक महापौरांच्या नामफलकाला काळे फासले. त्याचबरोबर उपमहापौर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आमदारांच्या नामपाट्यांना, तसेच त्यांच्या कक्षाच्या दरवाजांना काळे फासले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सहा कन्नड कार्यकर्त्यांना अटक केली. त्याचे पडसाद सीमा भागासह कोल्हापुरात उमटले आहेत.

"कर्नाटक रक्षण वेदिके' नामक संघटनेमध्ये सक्रिय असलेल्या बसवराज अवरोळ्ळी, इरफान व अन्य चौघांनी महापौर सरिता पाटील, उपमहापौर संजय शिंदे, आमदार संभाजी पाटील व आमदार संजय पाटील यांच्या महापालिकेतील कक्षाच्या दरवाजाला व नामफलकांना काळे फासले. महापालिकेचे कामकाज सुरू होण्याआधी म्हणजे साडेआठ वाजता हा प्रकार घडला.

दुपारी एकच्या सुमारास महापौर सरिता पाटील, उपमहापौर संजय शिंदे, आमदार संभाजी पाटील व सत्ताधारी गटाचे नगरसेवक महापालिकेत गेल्यानंतर पुन्हा कन्नड संघटनांची कोल्हेकुई सुरू झाली व त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमून घोषणा देण्यास सुरवात केली; पण महापालिकेची दोन्ही प्रवेशद्वारे बंद ठेवून त्यांना रोखण्यात आले. शिवाय पोलिस मोठ्या प्रमाणात तैनात केल्यामुळे त्यांना महापालिकेत प्रवेश करता आला नाही; पण काही महिलांनी मागील प्रवेशद्वारावर दगड व अंडी फेकली. या वेळी निदर्शने व घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. एका कन्नड संघटनेने महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर महापौरांच्या प्रतिमेचे काल दहन केले होते; पण आज महापालिकेचे दैनंदिन कामकाज सुरू होण्याआधीच "वेदिके'च्या कार्यकर्त्यांनी पालिकेत घुसून धिंगाणा घातला.

तरुणांना जामीन नाहीच...
काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झालेल्या 43 मराठी कार्यकर्त्यांना शनिवारीही जामीन मिळाला नाहीच. आश्‍चर्य म्हणजे यापैकी 13 जणांना अंधाऱ्या कोठडीत डांबण्यात आले होते. याच 13 जणांनी काल न्यायालयात आपल्या अंगावरील कपडे उतरवून पोलिसांनी मारहाण केलेल्या जखमा दाखवल्या होत्या. त्याचा सूड उगवण्यासाठी पोलिसांनी तुरुंगाधिकाऱ्यांना हाताशी धरून असा अन्याय चालवल्याची तक्रार मराठी नेत्यांनी केली आहे.

पंतप्रधानांकडे तक्रार
काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झालेल्या मराठी तरुणांना कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीची तक्रार महाराष्ट्र एकीकरण समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविली आहे. याप्रकरणी पंतप्रधानांनी लक्ष घालावे, मराठी भाषकांबरोबरची अमानवी वर्तणूक बंद करण्याची सूचना कर्नाटकाला द्यावी आणि पोलिस बळाचा वापर करून त्रास देणे बंद करण्यास सांगावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, केंद्रीय गृृहमंत्री राजनाथसिंह, कर्नाटकाचे राज्यपाल, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आदींना पाठविण्यात आल्या आहेत.

कर्नाटकच्या बस रोखल्या
बेळगावमध्ये एक नोव्हेंबरला काळ्या दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मराठी भाषकांच्या मूक मोर्चात सहभागी तरुणांना अटक करून कर्नाटक पोलिसांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने "कर्नाटक गाड्या रोको' आंदोलन करण्यात आले. येथील सीमा तपासणी नाक्‍यासमोर हे आंदोलन झाले. या वेळी कर्नाटक सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात कर्नाटक पासिंगचे ट्रक व बस अडवून परत पाठविण्यात आल्या. आंदोलनातून दुचाकी व चारचाकी छोटी वाहने वगळण्यात आली. दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली.

महापालिकेपासून पोलिस आयुक्त कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. असे असताना कन्नड संघटनांचे कार्यकर्ते महापालिकेवर हल्ला करतात, हेच चुकीचे आहे.
- सरिता पाटील, महापौर, बेळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com