खानापूर तालुक्यातील जंगलात १२ वाघांचे अस्तित्व

सुनील गावडे
रविवार, 29 जुलै 2018

बेळगाव - बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्‍यात वन्यजीव अभयारण्य झाल्याचे फायदे आता दिसू लागले आहेत. आठ वर्षांपूर्वीपर्यंत तालुक्‍यातील जंगलांत पट्टेरी वाघाचे अस्तित्‍व नगण्यच होते. दांडेली किंवा गोव्यातील अभयारण्यातून एखादा वाघ पाहुणा म्हणून येत असे. पण, आता भीमगड अभयारण्यासह तालुक्‍यातील विविध जंगलांत किमान १२ वाघ वस्ती करुन आहेत.

बेळगाव - बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्‍यात वन्यजीव अभयारण्य झाल्याचे फायदे आता दिसू लागले आहेत. आठ वर्षांपूर्वीपर्यंत तालुक्‍यातील जंगलांत पट्टेरी वाघाचे अस्तित्‍व नगण्यच होते. दांडेली किंवा गोव्यातील अभयारण्यातून एखादा वाघ पाहुणा म्हणून येत असे. पण, आता भीमगड अभयारण्यासह तालुक्‍यातील विविध जंगलांत किमान १२ वाघ वस्ती करुन आहेत.

यंदा जानेवारीत झालेल्या व्याघ्रगणनेची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही. या गणनेत प्रत्यक्ष व्याघ्रदर्शन झाले नसले तरी अनेक ठिकाणी वाघांच्या अस्तित्त्वाचे भक्‍कम पुरावे आढळले आहेत. त्यावरून स्थानिक वनखात्याने ही संख्या निश्‍चित केली आहे. वाघांच्या संख्येत वाढ झाल्याने वनखात्याच्या जबाबदारीतही वाढ झाली आहे.

विविध वनक्षेत्रातील वाघांची अंदाजित संख्या

  •     भीमगड : ३
  •     लोंढा : २
  •     कणकुंबी : २
  •     खानापूर : १
  •     नागरगाळी : २
  •     गोलिहळ्‌ळी : २

भीमगड परिसराला २०११ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाल्यानंतर तालुक्‍यातील वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे. २०१४ मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेत पाच वाघ असल्याचे पुरावे मिळाले होते. पण, २०१५ मधील राष्ट्रीय वन्यजीव सर्वेक्षणात ही संख्या सातवर पोचली होती. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये वनखात्याने पावलाचे ठसे, विष्ठा व कॅमेरा ट्रॅपच्या सहाय्याने केलेल्या सर्वेक्षणात १२ वाघ असल्याचे आढळून आले. 

ताज्या व्याघ्रगणनेत ही संख्या कायम असली तरी त्यात वाढही अपेक्षित आहे. तालुक्‍यात खानापूर व नागरगाळी असे दोन वन उपविभाग आहेत. सर्वाधिक ८ वाघ खानापूर उपविभागात असून नागरगाळीत किमान ४ आहेत. खानापूर उपविभागातील भीमगड अभयारण्यात सर्वाधिक तीन वाघ आहेत. अभयारण्यात एक काळा बिबट्याही (ब्लॅक पॅंथर) आहे. दांडेली व गोव्यातील महावीर अभयारण्यातील वाघांचेही हंगामी स्थलांतर होत असल्याने ही संख्या कमी-जास्त होत असते, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

भीमगड अभयारण्यामुळे या भागातील जैवविविधतेला संरक्षक कवच लाभले आहे. ‘अँटी पोचिंग कॅम्प’ उभारल्याने अवैध शिकार, वृक्षतोड व घुसखोरीला आळा बसला आहे. खाद्य व पाण्याच्या मुबलकतेमुळे तृणभक्षी प्राणी वाढले आहेत. परिणामी वाघांना पुरेसे खाद्य उपलब्ध झाले आहे. कडेकपारी, गुहांमुळे प्रजननाचीही सोय झाली आहे. गेल्यावर्षी एका वाघिणीने तीन बछड्यांना दिलेला जन्म त्याचीच फलश्रृती आहे.
- सी. बी. पाटील,
सहाय्यक वनसंरक्षक, खानापूर

 

 

Web Title: Belgaum News 12 tiger in Khanapur forest