बेळगाव महापालिकेच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यावर एसीबीचा छापा

संजय सूर्यवंशी
मंगळवार, 20 मार्च 2018

बेळगाव - महापालिकेचे सहायक कार्यकारी अभियंता व सध्या प्रतिनियुक्तीवर टिळकवाडी येथे स्मार्टसिटीचे काम पाहणारे अधिकारी किरण सुब्बाराव यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सकाळी छापा टाकला.

बेळगाव - महापालिकेचे सहायक कार्यकारी अभियंता व सध्या प्रतिनियुक्तीवर टिळकवाडी येथे स्मार्टसिटीचे काम पाहणारे अधिकारी किरण सुब्बाराव यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सकाळी छापा टाकला.

बेळगाव, बंगळूर व कारवार येथील सहा मालमत्तांवर छापे टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली. आज सकाळी सहा वाजता एकाच वेळी सर्व ठिकाणी कारवाईला प्रारंभ झाला.

उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याच्या संशयावरून आज सुब्बाराव यांच्यावर एसीबीने छापे टाकले. बेळगावातील गोडसेवाडी, राणी चन्नम्मानगर, हिंदू नगर येथील घरे व टिळकवाडी येथील त्यांच्या कार्यालयावर हा छापा पडला. शिवाय सुब्बाराव हे मूळचे कारवार जिल्ह्यातील सिद्धापूर येथील असल्याने तेथेही छापा टाकण्यात आला. त्यांच्या मालकीचे बंगळूर येथे अपार्टमेंट असल्याने  बंगळूरच्या पथकाने तेथे छापा टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली.

बेळगाव विभागाचे पोलिसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे उपअधीक्षक जे रघु, पोलीस निरीक्षक विश्वनाथ कब्बुरी, वाय. एस. धरनायक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी हा छापा टाकला. त्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकामध्ये 12 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. खानापूर येथील नगरपंचायतीच्या प्रथम दर्जा सहाय्यकावर छापा पडल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एसीबी छापा पडल्याने बेळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील बेकायदेशीर मालमत्ता जमविणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. निवडणुकीच्या तोंडावर एसीबीने आपली धडक कारवाई सुरू केल्याने याचा अधिकारी तसेच राजकीय मंडळींनी चांगलाच धसका घेतला आहे.

Web Title: Belgaum News ACB raid on Assistant Executive Engineer