निपाणीजवळ अपघातात चार ठार , कोल्हापूरच्या दोघांचा समावेश 

निपाणीजवळ अपघातात चार ठार , कोल्हापूरच्या दोघांचा समावेश 

निपाणी - भरधाव जाणाऱ्या कंटेनरचा पुढील टायर फुटून दुभाजकावरून पलीकडच्या रस्त्यावर जावून समोरून येणाऱ्या बुलेरोला जोराची धडक बसली. या भीषण अपघातात चार जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये कोल्हापूरच्या दोघांचा तर निपाणीच्या एकाचा समावेश आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर येथील महात्मा गांधी हॉस्पिटलजवळील उड्डाणपुलाजवळ सोमवारी (ता. 25) सकाळी 8 च्या सुमारास हा अपघात झाला. शब्बीर करीम सय्यद (वय 28, रा. कळंबा-कोल्हापूर), नदीम इसाक बागवान (वय 31, रा. दांडगेवाडी-कोल्हापूर), राजमहमद अब्दुलगफार बागवान (वय 37, बागवानगल्ली-निपाणी) व रमेश (वय 40, रा. कळगेडे, जि. राणेबेन्नूर) अशी मृतांची नावे आहेत. तर आनंद लमाणी (वय 28, रा. हिरेकेरूर-राणेबेन्नूर) व फय्युम सलीम बागवान (वय 32, रा. दांडगेवाडी-कोल्हापूर) अशी जखमींची नावे आहेत. त्यातील फय्युम बागवान यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कंटेनर (केए 52-5714) माल घेऊन पुणे येथून बेळगावकडे निघाला होता. निपाणीतील महात्मा गांधी हॉस्पिटलशेजारी आल्यानंतर कंटेनरचा पुढील टायर फुटला. त्यामुळे दुभाजकावरून पलीकडच्या रस्त्यावर गेला. त्याचवेळी घटप्रभा येथून भाजीपाला घेऊन बुलेरो (एमएच 09 सीए 8850) कोल्हापूरकडे निघाला होता. त्याला कंटेनरने समोरून जोराची धडक दिल्याने कंटेनर चालक रमेशसह बुलेरोमधील शब्बीर सय्यद, राजमहमद बागवान व नदीम बागवान असे एकुण चार जण जागीच ठार झाले. तर दोघे जण गंभीर जखमी आहेत. त्यापैकी कंटेनरचा क्‍लिनर आनंद लमाणीवर येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

अपघातानंतर एकमेकात अडकलेली दोन्ही वाहने क्रेन व पुंजलॉईडच्या भरारी पथकाने बाजूला केली. तर रमेशचा अडकलेला मृतदेहही अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले. पाऊस सुरू असतानाही निपाणीतील मुस्लीम बांधवांनी मदत यंत्रणा राबवून मृतदेहासह जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मंडल पोलिस निरीक्षक किशोर भरणी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

अपघात घडण्यापूर्वी काही क्षणात कंटेनरच्या मागे असलेली इचलकरंजी-होसपेट बस ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होती. पण कंटेनर लडबडल्याचे पाहून प्रसंगावधान राखत बसचालकाने वेग कमी केला. तरीही कंटेनरची बुलेरोला धडक बसल्यानंतर त्यातील भाजीपाला अक्षरशः बसमध्येही विखुरला. यावरून भीषण अपघाताची कल्पना येते. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com