निपाणी तालुका अंमलबजावणीसाठी तहसीलवर मोर्चा 

निपाणी ः निपाणी तालुका मागणीसाठी सर्वपक्षीयांतर्फे शुक्रवारी काढण्यात आलेला मोर्चा. 
निपाणी ः निपाणी तालुका मागणीसाठी सर्वपक्षीयांतर्फे शुक्रवारी काढण्यात आलेला मोर्चा. 

निपाणी - कर्नाटक सरकारने तालुका निर्मिती घोषणेत निपाणी तालुक्‍याला वगळून अन्याय केला आहे. तालुक्‍याची मागणी योग्य असताना दुजाभाव करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे शासनाने फेरविचार करून तत्काळ निपाणी तालुक्‍याची घोषणा करावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी दिला. 

तालुका घोषणेत निपाणी तालुक्‍याला वगळल्याने येथील सर्वपक्षीय नागरिकांनी शुक्रवारी (ता. 29) मूक मोर्चा काढून उपतहसीलदारांना निवेदन दिले. त्यानंतर झालेल्या सभेत प्रा. जोशी बोलत होते.

प्रा. जोशी म्हणाले, ""तालुका पातळीवरील सर्व कार्यालये निपाणीत उपलब्ध झाली आहेत. तालुका होण्याची योग्यता या शहरात असूनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जनमानसातील भावना तीव्र झाल्या आहेत. मागणी मान्य न झाल्यास वेगवेगळ्या पद्धतींनी आंदोलने करून तालुका निर्मितीस भाग पाडले जाईल. संपूर्ण ग्रामीण भागासह निपाणी शहरात बंद पाळून राज्य व महामार्ग रोखला जाणार आहे. 15 जानेवारीपर्यंत तालुक्‍याची घोषणा न झाल्यास आमरण उपोषणासह साखळी उपोषण केले जाईल. तत्पूर्वी मंगळवारी (ता. 2) नगरपालिकेत व्यापक बैठक घेऊन सर्वानुमते बुधवारी (ता. 3) निपाणी बंदची हाक दिली जाणार आहे.'' 

लक्ष्मण चिंगळे म्हणाले, ""निपाणी तालुक्‍याची शिफारस गद्दीगौडर, हुंडेकरी व एम. पी. प्रकाश समितीने केली आहे; पण तालुका घोषणेवेळी निपाणीला वळगले आहे. त्यामुळे शासकीय कामांना अडचणीचे ठरणार आहे. शिवाय या भागातील पाच ग्रामपंचायतींचा समावेश तालुक्‍यात करून त्याची घोषणा झाली पाहिजे. तसेच हुक्केरी तालुक्‍यातील काही गावांचा समावेश करावा, अन्यथा जनआंदोलन उभारून तालुका निर्मितासाठी लढा दिला जाईल.'' 

नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर म्हणाले, ""निपाणी तालुक्‍याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रथमतः रस्त्यावर उतरून शासनाला जागे करण्याचा प्रयत्न होत आहे. मंगळवारी (ता. 2) तालुक्‍याची घोषणा न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाणार आहे. 15 जानेवारीपर्यंत तालुक्‍याची घोषणा न झाल्यास सामूहिक  उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.''

माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी म्हणाल्या, "निपाणी तालुका अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असताना शासनाने अन्याय केला आहे. त्यासाठी बेमुदत आंदोलन करण्यास तयार आहोत.'' 

हालशुगरचे संचालक पप्पू पाटील म्हणाले, ""आपल्या भागातील पाच ग्रामपंचायती चिक्कोडीला जोडल्या असून त्या निपाणीत समाविष्ट कराव्यात, अशी मागणी यापूर्वी केली आहे; पण अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे शासकीय कामासाठी चिक्कोडीला जावे लागत आहे. आता निपाणी तालुका होण्यासाठी निपाणीकरांच्या लढाईत त्या भागातील ग्रामपंचायती अग्रभागी असतील.''

माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, ""दिलेल्या मुदतीत तालुक्‍याची अंमलबजावणी न झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना एकत्रित करून कोगनोळी नाक्‍यावर महामार्ग रोको केला जाईल. या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे.'' 

मूक मोर्चात सुजय पाटील, नगरसेवक बाळासाहेब देसाई-सरकार, अनिस मुल्ला, रवींद्र शिंदे, जुबेर बागवान, नितीन साळुंखे, रवींद्र चंद्रकुडे, नगरसेविका नम्रता कमते, नीता लाटकर, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, चंद्रकांत जासूद, चंद्रकांत कोठीवाले, माजी सभापती विश्‍वास पाटील, कबीर वराळे, अनिल शिंदे, शिरीष कमते, प्रसाद बुरूड, रवींद्र चंद्रकुडे, नितीन शिंदे, राजकुमार सावंत, राजेंद्र बोरगावे, मोहन बुडके, दिलीप जासूद, किरण कोकरे, विनोद साळुंखे, गणी पटेल, शौकत मणेर, केतन बोरगावे, दीपक वळिवडे, निकू पाटील, युवराज पोळ, डॉ. नंदकिशोर कुंभार, वकील संघाच्या अध्यक्षा ऍड. अनिता सूर्यवंशी यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com