सतीश जारकीहोळी समर्थकांचे बंगळूर राजभवनासमोर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

बंगळूर - यमकनमर्डीचे आमदार व माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद न मिळाल्यामुुळे नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकानी बंगळूर येथील राजभवनासमोर आंदोलन केले. या आंदोलनात बेळगावच्या नगरसेविका जयश्री माळगी यांच्यासह आयेशा बाळेकुंद्री, तसेच बेळगाव, खानापूर व यमकनमर्डी येथील त्यांच्या समर्थकानी या आंदोलनात सहभाग घेतला.

बंगळूर - यमकनमर्डीचे आमदार व माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांना मंत्रीपद न मिळाल्यामुुळे नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकानी बंगळूर येथील राजभवनासमोर आंदोलन केले. या आंदोलनात बेळगावच्या नगरसेविका जयश्री माळगी यांच्यासह आयेशा बाळेकुंद्री, तसेच बेळगाव, खानापूर व यमकनमर्डी येथील त्यांच्या समर्थकानी या आंदोलनात सहभाग घेतला.

पोलिसांनी आंदोलकांना तातडीने ताब्यात घेतले व म्हैसूर रोडवरील पोलिस आयुक्त कार्यालयात नेले. मंत्रीपदासाठी रमेश व सतीश या जारकीहोळी बंधूंमध्ये स्पर्धा होती. मंगळवारी सायंकाळपर्यंत सतीश यांचेच नाव आघाडीवर होते. पण मंगळवारी रात्री उशिरा सतीश यांना डावलून रमेश यांना मंत्रीपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती बुधवारी सकाळी सतीश यांच्या समर्थकांना समजल्यानंतर त्यांनी राजभवन समोरच रस्त्यावर ठाण मांडले व आंदोलन सुरू केले. सतीश यांना मंत्रीपद मिळणार या शक्‍यतेने त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने बंगळूरला गेले होते. बेळगावचे कन्नड व काही मराठी नगरसेवकही मंगळवारीच बंगळूरला रवाना झाले होते. पण सतीश यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला.

2013 साली राज्यात कॉंग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर सतीश यांना अबकारी खात्याचे मंत्रीपद मिळाले होते. शिवाय बेळगाव जिल्हा पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण 2015 साली सतीश यांनी अबकारी खात्याचे मंत्रीपद नको अशी भूमिका घेतली, त्यावरून तात्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या व सतीश यांच्यात मतेभद झाले. सतीश यांनी तडकाफडकी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.

सतीश यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना तातडीने लघुउद्योग खात्याचे मंत्रीपद देण्यात आले. पण 2016 साली झालेल्या मंत्रीमंडळ पुनर्रचनेत त्यांचे मंत्रीपद काढून घेण्यात आले. त्यांचे बंधू व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांना लघुउद्योग खात्याचे मंत्रीपद तसेच बेळगाव जिल्हा पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.

त्यानंतर सतीश पक्षनेतृत्वावर नाराज होते, ते धर्मनिरपेक्ष जनता दलात प्रवेश करणार अशी चर्चा होती. पण कॉंग्रेस पक्षाकडूनच यमकनमर्डी मतदारसंघातून ते पुन्हा निवडून आले. यावेळी पुन्हा त्यांना डावलून त्यांचे बंधू रमेश याना मंत्रीपद देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे स्वतः सतीश व त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. याचे पडसाद नजीकच्या काळात उमटण्याची शक्‍यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum News agitation of Sathish Jarkiholi Supporters