‘आश्रय इन्फ्राकॉन’ला दणका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

बेळगाव - आश्रय सौहार्द सोसायटीतील कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अद्याप मिळालेल्या नाहीत. याच संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या आश्रय इन्फ्राकॉनकडून ८ कोटी ६६ लाख रुपये सोसायटीचे कर्ज येणे आहे. त्यामुळे, इन्फ्राकॉनच्या नावे असलेल्या व सध्या बांधकाम सुरू असलेल्या अनगोळमधील मालमत्तेसंबंधी आदेशपूर्व जप्ती आदेश मिळवला असल्याची माहिती विशेष तपास अधिकारी बसवराज होंगल यांनी ‘सकाळ’ला दिली.

आश्रय सोसायटीमधील गैरव्यवहार सुमारे आठ वर्षांपूर्वी उघडकीस आला. ठेवीदारांना आजतागायत कोट्यवधींच्या ठेवी मिळालेल्या नाहीत. शिवाय संचालक मंडळावर कडक कारवाईही झालेली नाही. प्रकरणाच्या चौकशीसाठी कर्नाटक सौहार्द फेडरल को-ऑपचे अधिकारी बसवराज होंगल यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. काही ठेवीदारांनी बुधवारी (ता. २०) त्यांची भेट घेऊन ठेवींबाबत विचारणा केली. 
आश्रय सोसायटीचे सुमारे १५ हून अधिक मोठे कर्जदार आहेत; परंतु सर्वात मोठे कर्ज आश्रय इन्फ्राकॉनने घेतले आहे; परंतु ही रक्कम भरण्यास त्यांनी टाळाटाळ केली आहे. ही मोठी रक्कम भरल्यास अनेकांच्या ठेवी परत देता येणे शक्‍य आहे.

इन्फ्राकॉनने घेतलेल्या जागेवर अपार्टमेंट उभारणी सुरू आहे; परंतु त्यावर मोठे कर्ज असताना इतरांनी फ्लॅट खरेदी करून फसले जाऊ नये, यासाठी या मालमत्तेवर (रि.स. क्रमांक ३०/ए/१//३) आदेशपूर्व जप्ती आणण्याची मागणी सौहार्द फेडरलकडे केली होती. त्यानुसार आदेशपूर्व जप्ती आदेश प्राप्त झाला आहे, अशी माहिती श्री. होंगल यांनी दिली. ठेवीदारांनी त्याच्या प्रतीची मागणी केल्यानंतर अर्ज घेऊन दोन दिवसांत प्रत देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. यावेळी अरविंद घाटगे, विजय चव्हाण, जे. एस. शहापूरकर, विश्‍वास लटकन, नागराज पुजारी, दत्तात्रय कामू, शंकर पवार आदी ठेवीदार उपस्थित होते. 

आश्रय सोसायटीच्या ठेवी मिळाव्यात, या दृष्टीने आवश्‍यक असलेली सर्व पावले आम्ही उचलत आहोत. आश्रय इन्फ्रॉकॉन मालमत्तेचा आदेशपूर्व जप्ती आदेश हा त्याचाच पहिला टप्पा आहे. ठेवीदारांना ठेवी मिळेपर्यंत मी याचा सखोल तपास करणार आहे. 
- बसवराज होंगल,
 
विशेष तपास अधिकारी

Web Title: Belgaum News Asharaya society fraud