काँग्रेसच्‍या ‘डीके’ बंधूंवर सीबीआय छापे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

बंगळूर - सत्तास्थापनेचे भाजपचे मनसुबे उधळून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे काँग्रेसचे प्रभावी नेते डी. के. शिवकुमार व त्यांचे बंधू खासदार डी. के. सुरेश आता सीबीआयच्या रडारवर आले आहेत. त्यांची निवासस्थाने व कार्यालयावर गुरुवारी (ता. ३१) सीबीआयने छापे टाकले.

बंगळूर - सत्तास्थापनेचे भाजपचे मनसुबे उधळून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे काँग्रेसचे प्रभावी नेते डी. के. शिवकुमार व त्यांचे बंधू खासदार डी. के. सुरेश आता सीबीआयच्या रडारवर आले आहेत. त्यांची निवासस्थाने व कार्यालयावर गुरुवारी (ता. ३१) सीबीआयने छापे टाकले. दरम्यान, आपल्यावरील छापे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप शिवकुमार व खासदार सुरेश यांनी केला आहे. काँग्रेसनेही या कारवाईचा निषेध केला आहे. 

शिवकुमार यांच्या ११ नातलग व समर्थकांच्या घरांवरही छापे टाकले आहेत. बंगळूर, कनकपूर, रामनगर आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी रामनगरमधील कार्पोरेशन बॅंकेत अनधिकृत व्यवहार झाला असल्याच्या आरोपावरून सीबीआय न्यायालयाकडून सर्च वॉरंट मिळवून छापे घातल्याचे समजते. छाप्यानंतर आमदार शिवकुमार व खासदार डी. के. सुरेश यांनी पत्रकार परिषदेत घेऊन केंद्र सरकार स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग करून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.

आपला राजकीय प्रभाव सहन न झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी सीबीआयचा आधार घेऊन लक्ष्य केले आहे. केंद्र सरकार मला व माझ्या नातलगांना जाणीवपूर्वक त्रास देत आहे. यासाठी सीबीआय, प्राप्तीकर, ईडीमार्फत अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे श्री. शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

गेल्या १५ दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आम्ही कुणाच्याही आमिषाला बळी पडलो नाही. राज्यात काँग्रेस-धजद मैत्री सरकार स्थापन करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका पार पाडल्याने सूडाचे राजकारण करण्यात येत आहे.
- डी. के. सुरेश,
खासदार

Web Title: Belgaum News CBI raid on congress leader D K brothers