बेळगावात नगरसेवकावर ठेकेदाराचा हल्ला

मल्लिकार्जुन मुगळी
मंगळवार, 6 मार्च 2018

बेळगाव - येथील काळी आमराईमधील नगरसेवक सतीश देवर पाटील यांच्यावर ठेकेदार डी. एल. कुलकर्णी यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर लागलीच नगरसेवक पाटील यांनी खडे बाजार पोलिस ठाण्यात जावून कुलकर्णी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

बेळगाव - येथील काळी आमराईमधील नगरसेवक सतीश देवर पाटील यांच्यावर ठेकेदार डी. एल. कुलकर्णी यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर लागलीच नगरसेवक पाटील यांनी खडे बाजार पोलिस ठाण्यात जावून कुलकर्णी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. महापालिकेच्या कोनवाळ गल्लीतील विभागीय कार्यालयात ही घटना घडली आहे. या घटनेत नगरसेवक पाटील यांचा शर्ट फाटला. 

सहाय्य अभियंते एम. व्ही. हिरेमठ यांच्यासमोर ही घटना घडली. नगरसेवक पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिसऱ्या टप्प्यातील शंभर कोटी रूपये निधीतून सतीश पाटील यांच्या प्रभागात एक काम सुरू आहे. त्या कामासंदर्भात अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी पाटील कोनवाळ गल्लीतील कार्यालयात गेले होते. पाटील व अभियंते हिरेमठ यांच्यात चर्चा सुरू असताना ठेकेदार कुलकर्णी त्या ठिकाणी आले. त्यावेळी नगरसेवक व ठेकेदार यांच्यात शाब्दीक चकमक झाली.

तिसऱ्या टप्प्यातील शंभर कोटी निधीचा संबंध आमदारांशी आहे, नगरसेवकांशी नाही. त्यामुळे त्या निधीतील कामांबाबत नगरसेवकांना तक्रार करण्याचा अधिकार नाही असे ठेकेदार कुलकर्णी म्हणाले. त्यावरून हा वाद वाढत केला व कुलकर्णी यांनी पाटील यांच्यावर हल्ला केला.

हल्ल्यानंतर कुलकर्णी लगेचच तेथून पळून गेले. घटनेनंतर महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी तातडीने कोनवाळ गल्ली कार्यालयात गेले व त्यांनी घटनेची माहिती घेतली. त्यानंतर पाटील यांनी नगरेसवक भैरगौडा पाटील यांच्यासोबत जावून कुलकर्णी यांच्या विरोधात तक्रार नोंदविली. नगरसेवकांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. पण ठेकेदाराने नगरसेवकावर हल्ला केल्याची घटना प्रथमच घडली आहे. 

Web Title: Belgaum news contractor attack on corporator