बेळगावः ठेकेदाराने धमकावल्याची नगरसेवक गुंजटकर यांची तक्रार

मल्लिकार्जुन मुगळी
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

बेळगावः महापालिकेच्या सफाई ठेकेदाराने नगरसेवक विनायक गुंजटकर यांना धमकावल्याची व शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. मासेकर नावाच्या ठेकेदाराने आपल्याला शिवीगाळ केल्याची व धमकावल्याची लेखी तक्रार गुंजटकर यांनी महापौर संज्योत बांदेकर यांच्याकडे केली आहे. याशिवाय त्या ठेकेदारावर कारवाई केली जावी, त्याचा ठेका रद्द केला जावा अशी मागणीही केली आहे.

बेळगावः महापालिकेच्या सफाई ठेकेदाराने नगरसेवक विनायक गुंजटकर यांना धमकावल्याची व शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. मासेकर नावाच्या ठेकेदाराने आपल्याला शिवीगाळ केल्याची व धमकावल्याची लेखी तक्रार गुंजटकर यांनी महापौर संज्योत बांदेकर यांच्याकडे केली आहे. याशिवाय त्या ठेकेदारावर कारवाई केली जावी, त्याचा ठेका रद्द केला जावा अशी मागणीही केली आहे.

विशेष म्हणजे ठेकेदार मासेकर हे सत्त्ताधारी गटाचे नगरसेवक रतन मासेकर यांच्या कुटुंबातीलच आहेत. त्यामुळे आता महापौर याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. गुंजटकर यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात सविस्तर माहिती नमूद केली आहे. अनगोळ येथील स्मशानभूमीतील स्वच्छतेवरून हे प्रकरण घडले आहे. गुंजटकर हे रक्षा विसर्जन कार्यक्रमासाठी अनगोळ स्मशानभूमीत गेले होते. त्यावेळी स्मशानभूमीच्या स्वच्छतेची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ठेकेदार मासेकर यांच्याशी संपर्क साधला व स्मशानभूमीत स्वच्छता करण्यास सांगीतले. पण त्यावेळी मासेकर यांनी अर्वाच्च भाषेत गुंजटकर याना शिवीगाळ केली. शिवाय प्रसिद्धीसाठी तुम्ही हे सर्व करत आहात असा आरोप गुंजटकर यांच्यावर केला. तुम्ही सांगीतलेले काम करणार नाही असेही मासेकर यांनी गुंजटकर याना सुनावले. पुन्हा फोन न करण्याची धमकीही दिली असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ज्या विभागाचे आपण नगरसेवक आहोत, त्या विभागातील स्वच्छतेबाबत सूचना करण्याचे अधिकार नगरसेवक म्हणून आपल्याला आहेत. पण स्वच्छता ठेकेदार नगरसेवकांसोबत असे वागत असतील तर मग सामान्य नागरीकांसोबत त्यांचे वागणे कसे असेल? असा सवाल गुंजटकर यांनी केला आहे. अशा घटनांमुळे नगरसेवकांचे मानसीक खच्चीकरण होईल व ठेकेदारांची मनमानी वाढेल ही बाब गुंजटकर यांनी महापौरांच्या निदर्शनाला आणून दिली आहे. त्यामुळे ठेकेदारावर तातडीने कारवाई केली जावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. मासेकर हे सुमारे आठ वर्षांपासून सफाई ठेकेदार म्हणून कार्यरत आहेत. पण त्यांच्याबद्दल याआधी अशी तक्रार दाखल झाली नव्हती. स्वच्छतेच्या कामाबाबतही त्यांच्या विरोधात कधी तक्रार दाखल झाली नव्हती. पण गुंजटकर यांना शिवीगाळ केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: belgaum news corporator vinayak gunjatkar complaint to Contractor