आप्पाचीवाडी फाट्यावर चक्काजाम आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार 

आप्पाचीवाडी : चक्काजाम आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर थांबविण्यात आलेले ट्रक. 
आप्पाचीवाडी : चक्काजाम आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर थांबविण्यात आलेले ट्रक. 

कोगनोळी - राष्ट्रीय महामार्गावरील आप्पाचीवाडी फाट्यावर निपाणी, कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी, आप्पाचीवाडी, आडी-बेनाडी, सौंदलग्यास परिसरातील वाहन मालक-चालकांकडून सोमवारी (ता. 23) चक्‍काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी अचानक निपाणी पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांवर सौम्य लाठीमार केला.

पोलिसांनी आंदोलकासह अन्य नागरिकांना देखील मारहाण केल्याने आप्पाचीवाडी फाट्यावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच अनेकांची तारांबळही उडाली. सोमवारी सकाळी चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्यासाठी वाहन मालक-चालक महामार्गावर उतरले. आप्पाचीवाडी फाट्यावर येऊन त्यांनी दुध, जनावरे व अन्य जीवनावश्‍यक साहित्य वाहतूक करणारी वाहने वगळता मालवाहतूक करणारी वाहने अडवून रस्त्याकडेला थांबविण्यास सुरूवात केली. त्यामुळे मालवाहू ट्रक, टेंपोंची रांग महामार्गावर लागली. सुमारे एक तासाहून अधिक काळ रस्त्यावरून येणारे सर्व ट्रक, मालवाहूसह अन्य वाहने अडविण्यात येत होती.

आप्पाचीवाडी फाट्यापासून हणबरवाडीफाटा तर निपाणीच्या दिशेने सुमारे अर्धा किलो मीटरपर्यंत वाहने उभी करण्यात आली होती. रस्त्यावरून केवळ कर्नाटक-महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बस, खासगी मोटारी व वाहने सोडण्यात आली होती. वाहनांची रांग लागताच पोलिस दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. तसेच सौम्य लाठीमारानंतर एका कार्यकर्त्याला ताब्यात घेऊन काही वेळानंतर सोडून देण्यात आले. 

कोणत्याही प्रकारची मोडतोड न करता आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत देशभर चक्‍काजाम आंदोलन करण्यात येत आहे.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या - 

  • डिझेल दर कमी करावेत
  • वाहनांवरील विविध कर कमी करावेत.
  • थर्ड पार्टी विमा रक्कम कमी करावी 
  • टोल बंद करावा. 
  • ट्रान्स्पोर्ट जीएसटी बंद व्हावा. 
  • महामार्गावरील पोलिसांचा नाहक त्रास बंद करावा

महामार्गावर वाहने अडविता येत नाहीत. आंदोलकांनी परवानगी न घेता नियम मोडल्याने सौम्य लाठीमार करावा लागला. 
- निंगनगौडा पाटील,
फौजदार 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com