गौरी लंकेश हत्या प्रकरणी प्रमुख संशयिताला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील प्रमुख संशयिताला एसआयटीने अटक केली. परशुराम वाघमारे (वय ३०, रा. सिंदगी, जि. विजापूर) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी (ता. १२) एसीएमएम (अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १४ दिवस एसआयटी कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला.

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील प्रमुख संशयिताला एसआयटीने अटक केली. परशुराम वाघमारे (वय ३०, रा. सिंदगी, जि. विजापूर) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी (ता. १२) एसीएमएम (अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १४ दिवस एसआयटी कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला.

परशुरामने गौरी लंकेश यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप असून दुचाकीचालक अद्याप सापडलेला नाही. दुचाकीचालक व हत्या करण्यासाठी वापरलेल्या पिस्तुलाचा शोध घेण्यात येत आहे. विशेष तपास पथकाने त्याला बंगळूरला आणले असून चौकशी सुरू आहे. त्याच्यासोबत आणखी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. मात्र त्याला 
 अधिकृत दुजोरा मिळाला नाही. परशुराम मराठी भाषक असून त्याचा चेहरा पोलिसांनी तयार केलेल्या रेखाचित्राशी मिळताजुळता आहे. त्याला अटक करण्यात आलेले ठिकाण सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.

एसआयटी अधिकाऱ्यांनी यासंबंधी सविस्तर माहिती उघड केलेली नाही. प्रमुख संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे वय ३० पेक्षा अधिक असून उंची ५ फूट १ इंच आहे. त्याच्याजवळ पिस्तूल अथवा बंदूक आढळली नाही.  चौकशी करूनच याबाबत निश्‍चित माहिती देण्यात येईल, असे एसआयटीने स्पष्ट केले.

गौरी लंकेश यांची हत्या झालेल्या ठिकाणच्या सीसी कॅमेऱ्यातील फुटेज व न्यायवैधक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालात दुचाकीवरून आलेल्या संशयितांची उंची ५ फूट २ इंच किंवा ५ फूट १ इंच असावी. त्याचे वजन ७० ते ८० किलो असावे, असे म्हटले होते. त्यानुसार एसआयटी अधिकाऱ्यांनी चार संशयितांची रेखाचित्रे तयार केली होती. मारेकऱ्यांना शस्त्रास्त्रे पुरविल्याच्या आरोपावरून के. टी. नवीनकुमार, अमोल काळे व अन्य दोघांना एसआयटी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच ताब्यात घेतले होते. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे परशुरामपर्यंत पोचणे पोलिसांना शक्‍य झाले.

आई बेशुद्ध
परशुरामला अटक झाल्याचे समजताच सिंदगीत राहणारी त्याची आई जानकीबाई बेशुद्ध पडली. त्यांच्यावर सिंदगीतील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्याला अटक झाल्यानंतर घरातील सर्व मंडळी घाबरून घर सोडून निघून गेल्याचे समजते.

Web Title: Belgaum News Gouri Lankesh Murder case