लंकेश हत्या प्रकरणातील तिघांची बेळगाव, खानापूरात परेड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

बेळगाव - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तिघांची बेळगाव, खानापूर परिसरात परेड घेतली. परशुराम वाघमारेला गोळी झाडण्यासाठी तयार करण्यात व त्याला काडतुसे मिळवून देण्यात राजेश डी. बंगेराचा सहभाग असल्यामुळे त्याला खानापूरच्या जंगलात नेऊन माहिती घेतली.

बेळगाव - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तिघांची बेळगाव, खानापूर परिसरात परेड घेतली. परशुराम वाघमारेला गोळी झाडण्यासाठी तयार करण्यात व त्याला काडतुसे मिळवून देण्यात राजेश डी. बंगेराचा सहभाग असल्यामुळे त्याला खानापूरच्या जंगलात नेऊन माहिती घेतली.

हुबळी येथील गणेश मिस्कीन व अमित बड्डी यांच्या हुबळी येथील घरांची झडती घेतली. गेल्या चार दिवसांपासून एसआयटी पथक बेळगाव व हुबळी परिसरात चौकशी करीत आहे. शनिवार, रविवारी हुबळीत तर सोमवार, मंगळवारी बेळगाव परिसरात चौकशी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

लंकेश हत्या प्रकरणात राजेश डी. बंगेरा (५०, पोलारू, ता. मडीकेरी, जि. कोडगु) हा दहावा संशयित आहे. २३ जुलैला एसआयटीने त्याला अटक केली आहे. दोन दिवसांपासून त्याला बेळगाव परिसरात आणून तपास सुरू केला आहे. नेमबाज असलेल्या राजेश बंगेराकडे दोन बंदुका आहेत. त्याने खानापूरच्या जंगलात येऊन प्रशिक्षण दिल्याचा संशय एसआयटीला आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. ३१ जुलै) त्याची खानापूर तालुक्‍यातील नेरसा, जांबोटी, बेळगाव-कारवार सीमारेषेवर रामनगर भागात परेड केल्याची खात्रीलायक माहिती आहे. गणेश मिस्कीनने गौरी लंकेश यांच्या खुनानंतर परशुराम वाघमारेकडून पिस्तूल काढून घेतले होते. त्यामुळे त्याचाही या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे समोर आले आहे.

गणेश, अमितच्या घरी तपास 

गणेश दशरथ मिस्कीन (२७, रा. गणेश मंदिरासमोर, आर. एन. शेट्टी रोड, चैतन्यनगर, हुबळी) व अमित रामचंद्र बड्डी (२७, रा. हबीब चाळ, बनशंकरी मंदिराच्या मागे, जनता बाजार, राणी चन्नम्मा सर्कल, हुबळी) या दोघांच्या घरात एसआयटीने चौकशी केली.

‘सिव्हिल’मध्ये वैद्यकीय तपासणी
एसआयटीचे उपअधीक्षक टी. रंगाप्पा यांच्या नेतृत्वाखालील पथक गणेश व अमितला घेऊन हुबळी व बेळगावला आले होते. बंगेरा याला एसआयटीचे पोलिस निरीक्षक व अतिरिक्त तपास अधिकारी श्रीधर पुजार यांचे पथक बेळगावला घेऊन आले होते. त्यानुसार सोमवार व मंगळवारी बेळगावात चौकशी झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर तिघांचीही मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून हे पथक संशयितांसह बंगळूरला रवाना झाले.

Web Title: Belgaum News Gouri Lankesh Murder case