महाराष्ट्राचे एसआयटी पथक बंगळुरात?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

बंगळूर - गौरी लंकेश व गोविंद पानसरे यांची हत्या एकाच पिस्तुलाने झाली असल्याचा अहवाल न्यायवैधक प्रयोगशाळेने दिला होता. या पार्श्वभूमीवर कॉम्रेड पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी करणारे महाराष्ट्र एसआयटी पथक परशुराम वाघमारेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी बंगळुरात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बंगळूर - गौरी लंकेश व गोविंद पानसरे यांची हत्या एकाच पिस्तुलाने झाली असल्याचा अहवाल न्यायवैधक प्रयोगशाळेने दिला होता. या पार्श्वभूमीवर कॉम्रेड पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी करणारे महाराष्ट्र एसआयटी पथक परशुराम वाघमारेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी बंगळुरात दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येत बऱ्याच अंशी साम्य आहे. या सर्वांची हत्या एकाच संघटनेकडून झाली असावी, असा संशय आहे. त्यामुळे, पुण्यातील कायदा व सुव्यवस्था विभागाचे प्रमुख तसेच दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येची चौकशी करणाऱ्या तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख बंगळूरला आले आहेत. हत्या प्रकरण आंतरराज्य असल्याने अधिक माहिती मिळविण्यासाठी परशुराम वाघमारेला ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
विचारवंतांना संरक्षण द्या

कर्नाटकातील आणखी चार विचारवंतांची हत्या करण्याचा कट एसआयटीने उघड केला आहे. त्यात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते व अभिनेता गिरीश कर्नाड, साहित्यिक के. एस. भगवान, नरेंद्र नायक व निडूमामीडी मठाचे वीरभद्र चन्नमल्ल स्वामी यांचा समावेश आहे. या चौघांना सशस्त्र सुरक्षा पुरवावी. त्यांची निवासस्थाने व कार्यालयांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच ते ये-जा करत असलेल्या मार्गावर एस्कॉर्ट देण्यात यावे, अशी विनंती एसआयटीने गृहखात्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्र पोलिसांकडून खानापुरात तपास?

खानापूर, ता. १९ : विचारवंत गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र पोलिसांनी खानापुरात तपास चालविला असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत स्थानिक पोलिसांकडे विचारणा केली असता दुजोरा मिळू शकला नाही. मात्र, गौरी लंकेश प्रकरणी अटकेत असलेल्या प्रवीणकुमारने चौकशीत खानापूरचा उल्लेख केला असल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातील तपास यंत्रणांनी खानापूरकडे मोर्चा वळविल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र पोलिसांचे एक पथक नुकतेच खानापुरात येऊन गेले आहे. पथकाने विचारवंतांच्या हत्यांसंबंधी माहिती घेतली नसली तरी तालुक्‍यातील काही ठिकाणांची माहिती खानापूर पोलिसांकडून घेतली आहे. ही माहिती कशासाठी घेतली, याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आमच्याकडे गौरी लंकेश हत्याप्रकरणी कोणतीच विचारणा केली नसल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक संगमेश होसमनी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

‘थर्ड डिग्री’ दिल्याची संशयितांची तक्रार

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांना पोलिसांकडून थर्ड डिग्री दिली जात असल्याची तक्रार उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. यासंबंधात न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांची छाननी केल्यानंतर तक्रारीवर सुनावणी करण्याचे उच्च न्यायालयाने ठरविले आहे.
चौकशीवेळी पोलिस आपल्यावर थर्ड डिग्रीचा वापर करून अमानुष वागणूक देत असल्याची तक्रार संशयित सुजितकुमार ऊर्फ प्रवीण, मनोहर यडगे, अमोल काळे व अमित देगवेकर यांनी एका अर्जाद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे.

अर्जदारांचे वकील एन. पी. अमृतेश यांनी न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्र सादर केले. पोलिसांकडून छळ होत असल्याची तक्रार प्रथम व तृतीय एसीएमएम न्यायालयात केली होती; पण दोन्ही न्यायालयांनी अर्जदारांची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिलेला नाही, असे त्यात म्हटले आहे. अर्जदारांना पोलिसांनी कोणताही त्रास दिलेला नाही किंवा छळवणूकही केलेली नाही. आरोपात तथ्य नाही, असे न्यायालयासमोर सांगितले.

Web Title: Belgaum News Gouri Lankesh Murder case investigation