कर्नाटकात आता ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’

संजय उपाध्ये
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

देशातील पहिलाच प्रयोग करताना वाहनावरील पारंपरिक नंबरप्लेट आता  मोठी, सुरक्षित आणि रात्रीही नंबर दिसू शकेल, अशी एकच डिझाईनची तसेच उच्च तंत्रज्ञानयुक्त करण्याचा कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आहे.

बेळगाव - वाहनांच्या नंबरप्लेटवर चित्रे, स्लोगन, मजकूर लिहिणाऱ्या तसेच फॅन्सी नंबरचा आधार घेत विविध ‘क्‍लृप्ती’ शोधणाऱ्या शौकिनांना तसेच चोरी आणि समाजविघातक कार्य करणाऱ्या समाजकंटकांना कर्नाटक वाहन खात्याने तडाखा देण्याचा विचार केला आहे. देशातील पहिलाच प्रयोग करताना वाहनावरील पारंपरिक नंबरप्लेट आता  मोठी, सुरक्षित आणि रात्रीही नंबर दिसू शकेल, अशी एकच डिझाईनची तसेच उच्च तंत्रज्ञानयुक्त करण्याचा कर्नाटक सरकारने निर्णय घेतला आहे.

एकसारखी प्लेट आणि नंबरप्लेटसाठी ‘हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट’ (एचएसएनपी) योजना राबविण्यात येत आहे. कर्नाटक वाहतूक खात्याने टेंडर काढले असून राज्यातील ६६ लाख वाहनांसाठी एकाच प्रकारची योजना राबविण्यात येणार आहे. नंबर प्लेटचा गैरवापर, मजकूर लिहिणे, तसेच वाहन चोरी या योजनेमुळे कमी होईल, अशी खात्याला आशा आहे.
नंबरप्लेटवर ‘४१४१’ या नंबराला विविध आकार देऊन ‘दादा’ किंवा ‘मामा’ करणे, तसेच ‘८०५५’ या अक्षरांचा ‘बॉस’ (BOSS) करणे, असे उद्योग केले जातात.

केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार (१९५०-५१) वाहनांच्या नंबरप्लेटवर अशोकचक्राचा (चार सिंह) होलोग्राम असणे आवश्‍यक आहे. तसेच नंबरप्लेटच्या डाव्या बाजूला ‘IND’ ही अक्षरे ठळक टाईपात आणि गडद निळ्या रंगात कोरलेली असावीत. त्यानंतर मोठ्या ठळक इंग्रजी अक्षरात आपल्या वाहनांचा नंबर असावा, असे निर्देश केंद्रीय वाहन कायद्याने दिले आहेत. सध्या वाहनांना नंबरप्लेट बसविण्यासाठी ५०० रुपये ते १००० रुपयांपर्यंत खर्च येतो. पण या नवीन नंबरप्लेट बसविणे वाहतूक खात्याने अनिवार्य केल्यास त्याचा खर्च २२०० रुपयांपर्यंत जाईल, असे सांगण्यात येत आहे.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सीसीटीव्हीत मारेकऱ्यांचे फुटेज मिळाल्यानंतरही त्यांनी वापरलेल्या वाहनांचा वाहन क्रमांक विशेष तपास पथकाला मिळू शकला नाही, त्यामुळे खाडकन जागे झालेल्या वाहतूक विभागाने ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घेतली आहे. ‘हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट’ ही योजना दिल्ली, चंदीगढ आणि अहमदाबादमध्ये सुरू आहे. बंगळुरूमध्येही मर्यादित प्रमाणात सध्या ‘हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट’ योजना सुरू आहे.

‘हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट’ची ठळक वैशिष्ट्ये - 
-  पारंपरिक नंबरप्लेटपेक्षा मोठी असणार.
-   रेडियमचा वापर. रात्रीही अक्षरे दिसणार
- खासगी, भाडोत्री आणि बसेससाठी स्वतंत्र अक्षरे.
- ४५ डिग्रीतूनही अक्षरे वाचता येईल असे तंत्र.
- क्रोिमयम लोगोचाही वापर होणार.

‘हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट’अंतर्गत नंबर प्लेटमध्ये लोगो असतो. तो लाेगो स्कॅन केल्यावर संबंधित मोटारीचा सर्व तपशील उपलब्ध होतो. येत्या काळात नवीन मोटार कायदा लागू होणार आहे. त्यात केवळ नंबरप्लेट एवढेच नव्हे तर बहुतेक मोटारीचे नियम बदलणार आहेत. कायद्यात हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट बदलाची नेमकी तरतूद कशी असणार याबद्दल निर्देश आल्यावरच अधिक माहिती देता येईल.
- महेश आनंदशेठ, आरटीओ निरीक्षक, चिक्कोडी

Web Title: Belgaum News High Security Number plate in Karnataka