बेळगाव शहरात कत्तलखान्यांचा मुद्दा ऐरणीवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

बेळगाव - शहरातील कत्तलखान्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असल्यामुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी शहरातील बेकायदा कत्तलखान्यांवरून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यामुळे आता महापालिकेने चिकन, मटण दुकानदारांचेही परवाने तपासण्यास सुरुवात केली आहे.

बेळगाव - शहरातील कत्तलखान्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असल्यामुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी शहरातील बेकायदा कत्तलखान्यांवरून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यामुळे आता महापालिकेने चिकन, मटण दुकानदारांचेही परवाने तपासण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत सर्व चिकन, मटण दुकानदारांनी व्यापार परवाने घ्यावेत. अन्यथा तीव्र कारवाई करण्यात येईल, असा आदेश महापालिकेने बजावला आहे. 

शहरात 120 चिकन, मटण दुकानदारांकडे व्यापार परवाने आहेत. पण, अनेक दुकानदार विनापरवानाच व्यापार करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधातही तक्रारी येत आहेत. बेकायदा कत्तलखाने सुरु असल्याच्या तक्रारीनंतर आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या पाहणी दौऱ्यानंतर पोलिस प्रशासनाने कारवाई करून बेकायदा मांस साठवून ठेवलेल्या तिघांना अटक केली आहेत. अजून चौदाजण फरारी आहेत. त्यामुळे, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापालिकेने रविवारी सुटी असतानाही कसाई गल्ली, ऑटोनगर परिसरात पत्रके वाटून आणि रिक्षातून ध्वनीक्षेपकाव्दारे जागृती मोहीम राबविली. सोमवारी (ता. 6) स्वत: आयुक्‍त शशिधर कुरेर, आरोग्याधिकारी डॉ. शशिधर नाडगौडा यांच्यासह अधिकाऱ्यांनी पाहणी केली. 

कत्तलखान्यांचा विषय वाढू नये, यासाठी महापालिकेकडे आता कारवाई हाती घेतली असून त्यामध्ये चिकन आणि मटण व्यापाऱ्यांनाही लक्ष करण्यात आले आहेत. काही परिसरात या दुकानांतूनही बेकायदा मांस विक्री होत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे सर्व दुकानदारांनी दोन दिवसांच्या आत व्यापार परवाना घ्यावा, अन्यथा अशा दुकानांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. शहरात 120 चिकन आणि मटण विक्रीच्या दुकानांना परवाना आहे. पण, अनेक ठिकाणी बेकायदा दुकाने सुरू असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांना अटकाव आणण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. 

कोणताही व्यवसाय करताना व्यापार परवाना आवश्‍यक असतो. चिकन, मटण दुकानदारांनीही दोन दिवसांच्या आत व्यापार परवाने घ्यावेत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी आधीही आम्ही जागृती मोहीम राबविली होती. त्यामुळे दुकानदारांनी व्यापार परवाने घ्यावेत. 
- डॉ. शशीधर नाडगौडा,
आरोग्याधिकारी, महापालिका 

Web Title: Belgaum News The issue of slaughter houses in city