कानडी पोलिसांना 'जय महाराष्ट्र'ची अॅलर्जी : बेळगावात 200 मराठी लोकांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मोर्चात सहभागी झालेले आमदार संभाजी पाटील आणि अरविंद पाटील यांनी भाषण संपवताना जय महाराष्ट्र म्हणण्यास टाळाटाळ केली. पण उपस्थितांच्या दबावामुळे त्यांना जय महाराष्ट्र म्हणणे भाग पडले. 

बेळगाव : जय महाराष्ट्राची अलर्जी झालेल्या कानडी पोलिसांनी आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आमदार, पदाधिकाऱ्यांसह सुमारे 200 मराठी भाषिकांवर गुन्हा दाखल केला. या सर्वांवर भारतीय दंड विधान कलम 153 अ, 180 व सहकलम 34 अंतर्गत मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या सर्वांवर घोषणा दिल्याचा ठपका ठेवला असला तरी यातील जय महाराष्ट्र हे बोचल्यामुळे पोलिसांनी आपली मनमानी दाखवून दिली आहे. 

एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आज विविध मागण्यांसाठी बेळगावात मोर्चा काढण्यात आला होता. धर्मवीर संभाजी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेला हा मोर्चा अगदी शांततेत निघाला. मोर्चेकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या घोषणा देताना संयुक्त महाराष्ट्राच्याही घोषणा दिल्या. गेल्या चार दिवसांपासून कर्नाटकी सरकार सीमाभागात 'जय महाराष्ट्र' म्हणण्यावर निर्बंध घालत आहे. त्यामुळे आजच्या मोर्चात 'जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र' अशी घोषणा देखील घुमली. त्यामुळे पोटशूळ उठलेल्या पोलिसांनी आज मराठी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना लक्ष केले. बेळगावचे आमदार संभाजी पाटील, खानापूरचे आमदार अरविंद पाटील, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष व माजी आमदार मनोहर किणयेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे यांच्यासह सुमारे 150 ते 200 कार्यकर्त्यांवर आज दुपारी मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यामुळे सीमाभागासह महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. 

याबाबत डीसीपी अमरनाथ रड्डी यांच्याशी संपर्क साधला असता मोर्चा वेळी घोषणा दिल्यामुळे गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ता दुजोरा दिला. हा गुन्हा जय महाराष्ट म्हटल्यामुळे दाखल झाला आहे का हे मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. आयुक्तालयाने घालून दिलेल्या नियम व अटींचे उल्लंखन केल्यामुळे हा गुन्हा दाखल झाल्याचेही त्यांनी सांगितले.

सीमाभागातील मराठी भाषकांना मराठी भाषेतील कागदपत्रे मिळावीत या मागणीसह सात मागण्यांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. कर्नाटकचे मंत्री बेग यांनी जय महाराष्ट्र म्हणण्यास बंदी आणणारा कायदा आणण्याची भाषा केल्याची पार्श्‍वभूमी लाभल्याने आजचा मार्चा जय महाराष्ट्रच्या घोषणांनीच अधिक गाजला. मोर्चात सहभागी आमदार संभाजी पाटील आणि अरविंद पाटील यांनी भाषण संपवताना जय महाराष्ट्र म्हणण्यास टाळाटाळ केली. पण उपस्थितांच्या दबावामुळे त्यांना जय महाराष्ट्र म्हणणे भाग पडले. 

समितीच्या वतीने मराठी कागदपत्रांप्रमाणे सातबारा उताऱ्यावरील नो क्रॉप शब्द काढून टाका, घरपट्टी आणि पाणी बीलातील वाढ कमी करावी, मास्टर प्लॅनमध्ये जागा गेलेल्यांना नुकसान भरपाई द्यावी, कस्तुरीरंगन अहवाल रद्द करावा, शेतमालाला हमीभाव मिळावा आणि कर्जमुक्ती मिळावी तसेच बल्लारी नाला पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावा या मागण्या करण्यात आल्या आहेत.
 

Web Title: belgaum news jai maharashtra ban 200 arrested